जलाशयातील पाणीपातळीत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 12:33 AM2019-01-26T00:33:41+5:302019-01-26T00:33:44+5:30
जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरविल्याने जलाशय भरलीच नव्हती. परंतु जे काही थोडेफार पाणी होते ते देखील आता आटू लागले आहे. हे पाणी आटण्यामागे कमी पावसासह बाष्पीभवन हा ही एक मोठा घटक असल्याचे सांगण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरविल्याने जलाशय भरलीच नव्हती. परंतु जे काही थोडेफार पाणी होते ते देखील आता आटू लागले आहे. हे पाणी आटण्यामागे कमी पावसासह बाष्पीभवन हा ही एक मोठा घटक असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात यंदा सरासरीच्या केवळ ६१ टक्के पाऊस पडला. गेल्या दोन वर्षामध्ये पावसाने जेमतेम हजेरी लावल्याने जलाशयांमध्ये पुरेसा जलसाठा झालाच नाही. मध्यंतरी राज्य सरकारच्या वतीने मोठा गाजावाजा करून जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली. परंतु त्यातही जी कामे तांत्रिक पद्धतीने दर्जेदार व्हायला हवी होती, ती न झाल्याने देखील जलयुक्त शिवार योजना पाहिजे तेवढी प्रभावी ठरली नाही.
जलयुक्त शिवार योजना राबविताना गेल्या चार वर्षांमध्ये जवळपास सात ते आठ वेळा नवीन अध्यादेश काढून त्यात सततचे बदल करत गेल्याने दरवर्षी नवीन पद्धतीने कामे करावी लागत असल्याने ग्रामस्थ आणि अधिकारी वैतागले होते. त्यातच यंदा पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे यंदाचा दुष्काळ आणखी तीव्र होणार आहे. आज घडीला जिल्ह्यात १५० पेक्षा अधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. भविष्यात ही टँकरची आणखी वाढणार आहे. तर टँकर भरण्यासाठी पाण्याचे नवीन स्त्रोत प्रशासनाला शोधावे लागणार आहेत.
जालना शहर व परिसरात विशेष करून जुना जालना भागामध्ये मोती तलाव आणि मुक्तेश्वर तलाव हे दोन पाण्याचे मोठे स्त्रोत आहेत. परंतु यातील पाणीपातळी आता झपाट्याने कमी होत आहे. याचा परिणाम परिसरातील पशुधनाला बसणार आहे. जुना जालना भागामध्ये चारा छावणी तसेच पाणी पुरवठा करून जनावरांसाठी स्वतंत्र हौद बांधण्याची मागणी यापूर्वीच पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याकडे लाड गवळी समाजाचे अध्यक्ष गणेश सुपारकर तसेच परिसरातील पशुपालकांनी निवेदनाद्वारे केली आहे.