महिन्याभरापासून तळणी गावचा पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:56 AM2021-02-06T04:56:46+5:302021-02-06T04:56:46+5:30

तळणी : शेगाव- पंढरपूर या दिंडी महामार्गाच्या खोदकामामुळे तळणी बसस्थानक भागातील मुख्य जलवाहिनी व अंतर्गत जलवाहिनी फुटली होती. याला ...

Water supply to Talani village has been cut off for over a month | महिन्याभरापासून तळणी गावचा पाणीपुरवठा बंद

महिन्याभरापासून तळणी गावचा पाणीपुरवठा बंद

Next

तळणी : शेगाव- पंढरपूर या दिंडी महामार्गाच्या खोदकामामुळे तळणी बसस्थानक भागातील मुख्य जलवाहिनी व अंतर्गत जलवाहिनी फुटली होती. याला दोन वर्षे उलटले तरीही अद्याप जलवाहिनी दुरुस्त करण्यात आलेली नाही. त्यातच दुसऱ्या पाणीपुरवठा योजनेचे महिन्याभरापासून रोहित्र जळाल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

मंठा तालुक्यातील तळणी गावाला पूर्णा नदी, जुन्यातील विहीर व दलितवस्ती विहीर अशा तीन योजनांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. तळणी गावाची लोकसंख्या वाढल्यामुळे या तीनही योजनांचे पाणी कमी पडत असल्यामुळे आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा सुरू होता. मात्र , दोन वर्षांपूर्वी पूर्णा नदीपात्रातील विहिरीवरून जलकुंभाला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी व अंतर्गत जलवाहिनी दिंडी महामार्गावरील खोदकामामुळे फुटली. त्यामुळे बसस्थानक भागातील पाणीपुरवठा पूर्णत बंद आहे.

त्यानंतर ग्रा. पं.ने जुन्यातील विहिरीवरून गावातील काही भागात तर दलितवस्ती विहिरीवरून काही भागात पाणीपुरवठा सुरू केला. त्यातही जुन्यातील विहिरीवरील विद्युतपुरवठा करणारे रोहित्र जळाल्याने महिन्याभरापासून या विहिरीवरून होणारा पाणीपुरवठा बंद आहे. केवळ दलितवस्तीची एकमेव पाणीपुरवठा करणारी योजना सुरू आहे. दलितवस्ती वगळता बसस्थानक व गावात पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही मोठ्या योजना बंद पडल्याने ग्रा. पं. पाणीपुरवठा करण्यास असमर्थ ठरत आहे. गावाला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी आंदोलनेदेखील करण्यात आली. परंतु, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

रास्ता रोको करणार : पवार

मेघा कंपनीकडून रस्ता खोदकामामुळे तळणीतील जलकुंभाला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी व बसस्थानक भागात पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली होती. दोन वर्ष उलटले तरीही कंपनीने दुरुस्ती केली नाही. कंपनीने नवीन पाइपलाइन करावी, अन्यथा, कंपनीविरोधात २० फेब्रुवारी रोजी रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा सरपंच उद्धव पवार यांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

Web Title: Water supply to Talani village has been cut off for over a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.