जालन्यात चाललंय काय? मोती तलावापाठोपाठ जंगी तलावातील हजारो माशांचा मृत्यू
By विजय मुंडे | Published: March 8, 2023 04:15 PM2023-03-08T16:15:53+5:302023-03-08T16:17:05+5:30
घातपाताचा संशय : चार दिवसांमध्ये दोन मोठ्या तलावातील हजारो मास्यांचा मृत्यू
अंबड (जि.जालना) :जालना शहरातील मोती तलावातील हजारो मासे चार दिवसांपूर्वी अचानक मृत झाले होते. अशीच घटना अंबड येथील मत्स्योदरी देवी मंदिर परिसरातील जंगी तलावात मंगळवारी सकाळी समोर आली. या तलावातील हजारो माशांचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित व्यावसायिकाने कोणीतरी घातपात केल्याचा संशय व्यक्त केला आहे.
शहरातील सयफान फारुकी यांनी मत्स्य शेतीसाठी नगरपालिकेकडून सहा महिन्यांच्या कराराने १४ लाख रुपये भरून जंगी तलाव घेतला आहे. या तलावात त्यांनी प्रारंभी ३० टन मत्स्यबीज टाकले. परंतु पावसामुळे ते वाहून गेले. त्यांनी नंतर पैसे जमा करून तेवढेच मत्स्यबीज टकले होते. करार संपण्यासाठी केवळ दोन महिने बाकी होते. हे मासे विक्री करून काहीसे उत्पन्न हाती पडेल, अशी आशा त्यांना होती. परंतु, मंगळवारी सकाळी या तलावातील मासे अचानक मृत झाल्याचे समोर येताच व्यावसायिकाला मोठा धक्का बसला आहे. त्यात त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जंगी तलावात विषारी द्रव्य मिसळले असावे, असा संशय सयफान फारुकी, मुन्ना हाश्मी यांनी व्यक्त केला आहे. या घटनेची तपासणी करावी, दोषींवर कारवाई करावी, यासह एक वर्षाची मुदतवाढ द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
अहवाल आल्यानंतर कारवाई
जंगी तलावातील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मृत झालेले मासे काढून नष्ट केले जाणार आहेत. पाणी तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
- विक्रम मांडुरके, मुख्याधिकारी, अंबड