लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जनता कर्फ्यू हा शब्द जवळपास सर्वांनीच पहिल्यांदाच ऐकला, असेच म्हणावे लागेल. कर्फ्यू म्हटलं की, पोलीस आणि त्यांच्या सायरन वाजविणाऱ्या गाड्या प्रत्येकाच्या मनात काही तरी घडण्याची भीती कायम घर करून असते. परंतु रविवारचा कर्फ्यू हा जनतेने स्वत:च पाळला.कोरोनाच्या प्रतिबंधासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या आवाहनाला महाराष्ट्राप्रमाणेच जालनेकरांनीही भरभरून साथ दिली. रविवारची सुटी बाहेर फिरून आनंदात घालविण्यात येते. परंतु, आज सुटी असूनही कोणाचकडे न जाता घरातील ज्येष्ठ मंडळी नामस्मरणात मग्न होती. तर काही जण कुटुंबातील सदस्यांशी गप्पा मारत होते. अनेकांनी घरात विविध खाद्यपदार्थ तयार करून त्यावर ताव मारला. तर काहींनी उन्हाळ्यातील पापड बनविण्यासाठी कुटुंबातील महिलांना मदत केली. बच्चे कंपनीने बुद्धिबळ, कॅरम इ. बैठे खेळ खेळले. सायंकाळी ठिकठिकाणी टाळ्या, परात वाजवून तर कोणी फटाके फोडून प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांनी मोठी दाद दिली.
कुठे गप्पा तर कुठे बैठे खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 12:07 AM