जिल्ह्यातील प्रमुख पीक म्हणून कपाशीची लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणावर करतात. यंदा तीन लाख दहा हजार हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली होती. ही पेरणी वेळेत झाली होती; परंतु नंतर ऐन काढण्याच्या वेळी अवकाळी पाऊस आणि परतीच्या पावसाने जिल्ह्यात थैमान घातले होते. अशा स्थितीत शेतकरी हवालदिल झाला होता; परंतु नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदत मिळाली. नंतर कपाशीचे पीकही बंपर आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जालना जिल्ह्यात थेट कापूस खरेदीत ४० टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले. जालन्यात सीसीआयने आठ प्रमुख केंद्रे, तसेच ३५ जिनिंगच्या माध्यमातून ही कापूस खरेदी करण्यात आली. आजही काही केंद्रांवर तुरळक खरेदी सुरू असून, कापसाची आणखी एक वेचणी होऊ शकते, असे सांगण्यात आले.
जालना जिल्ह्यात यंदा ९ लाख ८५ हजार क्विंटल कापूस खरेदी केला आहे. ज्या कापसाला प्रतिक्विंटल पाच हजार ८०० रुपयांचा हमी भाव देण्यात आला आहे. त्यानुसार आतापर्यंत जवळपास ५८० कोटी रुपयांची खरेदी झाली असल्याचे सांगण्यात आले.
फरदडच्या मोहात पडू नका
यंदा कापसाचे चांगले उत्पादन झाले आहे. असे असताना अनेक शेतकरी आपल्या शेतातील कापूस अद्यापही शिल्लक ठेवून त्याची वेचणी करत आहेत; परंतु हा फरदड कापसाचा मोह शेतकऱ्यांसाठी भविष्यात धोकादायक ठरू शकतो. कारण यंदा पुन्हा एकदा बोंडअळीने काही भागांत डोके वर काढले हाेते. त्यामुळे फरदडमुळे या बोंडअळीच्या वाढीस पूरक वातावरण मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा मोह आवर्जून टाळावा.
-अजय मिटकरी, कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी