संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यात एकूण पाच विधानसभा मतदार संघ आहेत. पैकी गेल्या निवडणुकीत तीन मतदार संघावर शिवसेना-भाजपचे वर्चस्व राहिले आहे. गेल्या निवडणुकीत ऐनवेळी युती तुटल्याने भाजपा- शिवसेना युतीच्या उमेदवारांची चांगलीच दमछाक झाली होती. यंदा वंचित आघाडी जिल्ह्यात कुठली जादू चालविते ? यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप-सेना युतीचे भवितव्य ठरणार आहे.जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात सत्ताधारी आणि विरोधकांनी गेल्या सहा महिन्यांपासून निवडणुकीची मोर्चेबांधणी केली आहे. त्यात युतीकडे सत्ता असल्याने त्यांच्याकडे केलेली विकास कामे सांगण्यासाठीचे अनेक मुद्दे आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच वंचित आघाडी सत्ताधाऱ्यांना कसे आणि कोणत्या मुद्द्यावर जेरीस आणणार, हे पाहणे लक्षणीय ठरणार आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये ज्या काही नागरी समस्या आहेत त्या थोड्याबहुत प्रमाणात सुटल्या आहेत. परंतु वाढती लोकसंख्या आणि मिळणारा निधी यांचे समिकरण जुळविताना प्रशासनाच्या नाकी नऊ येत आहेत. लोकप्रतिनिधी घोषणा करून मोकळे होतात. परंतु नंतर केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करताना यंत्रणेची परीक्षा असते. गेल्या काही वर्षांमध्ये जालना जिल्ह्याला हजारो कोटी रूपयांचा विकास निधी मिळाला आहे. परंतु, या निधीतून सुरू असलेल्या कामांच्या दर्जाकडे पाहिजे तेवढे लक्ष दिले जात नसल्याचे वास्तव आहे.जिल्ह्याच्या राजकारणात आजघडीला शिवसेना-भाजप युतीची चलती आहे. या युतीच्या घौडदौडीला लगाम घालण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कुठला दारूगोळा वापरतात याकडेही मतदारांचे लक्ष लागून राहिल. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रशासनही कामाला लागले असून, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची तातडीची बैठक शनिवारी दुपारी बोलावून सूचना दिल्या आहेत. निवडणुका जाहीर होण्याची औपचारिकता आता पूर्ण झाली आहे.पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणालापरतूर मतदार संघातून भाजपच्या तिकिटावर दुस-यांदा निवडून आलेल्या बबनराव लोणीकर यांना दुसºया मंत्रीमंडळ विस्तारात थेट कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागली. जालना जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही त्यांच्याकडे चालून आले. स्वच्छता आणि पाणीपुरवठा खाते त्यांच्याकडे असल्याने त्यांच्याकडून राज्यासह जिल्ह्याला मोठ्या अपेक्षा होत्या. स्वच्छता अभियान, गावोगाव शौचालयांची उभारणी, वॉटर ग्रीड प्रकल्प यासह अन्य योजना त्यांनी घोषित करून काही योजना अंमलातही आणल्या. जिल्ह्यातील विकासाबाबतही ते अनुकूल असले तरी आता त्यांची परीक्षा आहे. परतूर मतदार संघातून त्यांचे परंपरागत प्रतीस्पर्धी सुरेशकुमार जेथलिया यांनाच उमेदवारी मिळेल, यात शंका नाही. परंतु, सध्या तरी नाव जाहीर नाही.अर्जुन खोतकर, कैलास गोरंट्याल यांचीही कसोटीशिवसेनेचे नेते तथा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची या निवडणुकीत पुन्हा एकदा कसोटी लागणार आहे. मंत्रीपदाच्या काळात केलेली कामे ही त्यांची जमेची बाजू आहे. यंदा देखील त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी माजी आमदार कैलास गोरंट्याल या दोघांमध्ये थेट लढत होणार आहे. त्यामुळे जालन्याच्या लढतीकडे जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागून आहे. कृषी प्रदर्शन, कुस्ती स्पर्धा, भीम महोत्सव आदींच्या माध्यमातून खोतकरांनी मोर्चेबांधणी केली आहे. तर गोरंट्याल यांच्या ताब्यात जालना पालिकेची सत्ता आहे. त्यांच्या पत्नी संगीता गोरंट्याल या नगराध्यक्षा आहेत.नशिबी अन कमनशिबीजालना विधानसभा मतदार संघात गेल्या निवडणुकीत अत्यंत चुरशीची लढत झाली. मतमोजणीच्या वेळी कधी पारडे हे अर्जुन खोतकरांकडे तर कधी कैलास गोरंट्याल यांच्याकडे झुकत होते. शेवटी २९६ मतांनी अर्जुन खोतकर हे विजयी झाल्याने त्यांना विजयाचा गुलाल उधळण्याची संधी मिळाली.
‘युती’चे वर्चस्व की आघाडी देणार धक्का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 11:47 PM