रयतेच्या डोळ्यात स्वत:ला पाहणारा जाणता राजा : शिवाजी महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:22 AM2021-06-06T04:22:54+5:302021-06-06T04:22:54+5:30
देऊळगावराजा : हिंदुस्थानात हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तारखेनुसार राज्याभिषेक ६ जून रोजी साजरा केला जाणार आहे. ...
देऊळगावराजा : हिंदुस्थानात हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तारखेनुसार राज्याभिषेक ६ जून रोजी साजरा केला जाणार आहे. यंदाही कोरोनाचे सावट असल्याने काही निवडक निमंत्रितांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा केला जाणार आहे.
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, तर तारखेनुसार शिवरायांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी झाला. यादिवशी महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची अधिकृतपणे घोषणा केली होती. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी ६ जून रोजी किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ‘हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा’ या एकाच ध्यासाने संपूर्ण जीवन व्यापलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आहे. त्यामुळे हा दिवस सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो.
शिवजयंतीप्रमाणेच शिवराज्याभिषेक सोहळ्याबद्दल दोन गटांमध्ये मतभेद आहेत. यातील एक गट ६ जून रोजी ग्रेगेरियन कॅलेंडरप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करतात, तर काही जण ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी साजरा करतात. यंदा तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा रविवारी, ६ जून रोजी साजरा करण्यात येणार आहे.
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी अनेक शिवभक्त रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांचे दर्शन घेतात. यादिवशी शिवप्रेमी एकमेकांना राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देतात.
छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य म्हणजे रयतेचे राज्य म्हणून ओळखले जात होते. अठरा जातींना सोबत घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शेतकरी, महिलांचे हित आणि त्यांचा सन्मान करण्याचा ध्यास घेऊन तो त्यांनी प्रत्यक्षात उतरविला. त्या काळात पाणीव्यवस्थापन कसे असावे. याबद्दलही त्यांनी अत्यंत नियोजनपूर्वक कामे केली आहेत. त्यामुळे शिवकालीन पाणीपुरवठा ही योजना आजही तेवढीच त्या- त्या किल्ल्यांवर गेल्यानंतर दिसून येते.
राज्य सरकारने राज्यातील सर्व प्रमुख किल्ल्यांचे संरक्षण आणि त्याची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी विशेष निधीची योजना मंजूर करून त्याचे कामही सुरू झाले आहेत. शिवाजी महाराजांच्या गड -किल्ल्यांमधून त्या काळातील वैभव आणि तेथील संरक्षणाची तटबंदी कशी होती, हे प्रत्यक्ष भेट दिल्यावरच दिसून येते. त्यामुळे अनेक शिवप्रेमी आता पर्यटनासाठी अन्य शहरांमध्ये जाण्याऐवजी शिवाजी महाराजांनी उभारलेल्या किल्ल्यांना भेट देत असल्याचे दिसून येते. राज्य सरकारनेदेखील आता विशेष योजना जाहीर केल्याने आगामी काळात गड-किल्ले हे अधिक काळ टिकून नवीन पिढीला इतिहासाची प्रेरणा देतील. यात शंका घेण्याचे कारण नाही. शिवाजी महाराजांचे आजोळ हे सिंदखेडराजा येथील असल्याने त्यांचा आणि या परिसराचे एक भावनिक नाते जुळले होते. तो इतिहास आजही तेवढ्याच आत्मीयतेने अभ्यासला जातो. शिवाजी महाराजांची राज्य चालविण्याची पद्धत आणि त्यांची युद्ध नीती ही केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभर अभ्यासली गेली.