'मुलावरील गुन्हा मागे घ्या',नातेवाईकांच्या धमकीनंतर मुलीने संपवले जीवन; नागरिकांत संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 02:50 PM2024-12-11T14:50:58+5:302024-12-11T14:51:47+5:30

मुलाने फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची दिली होती धमकी

'Withdraw crime against child', girl ends life after threats from relatives; Anger among citizens | 'मुलावरील गुन्हा मागे घ्या',नातेवाईकांच्या धमकीनंतर मुलीने संपवले जीवन; नागरिकांत संताप

'मुलावरील गुन्हा मागे घ्या',नातेवाईकांच्या धमकीनंतर मुलीने संपवले जीवन; नागरिकांत संताप

जालना : मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. दाखल केलेला तो गुन्हा मागे घेण्यासाठी धमकी दिली जात असल्याने एका १६ वर्षीय मुलीने राहत्या घरी ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. १०) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास अंबड शहरात घडली. दरम्यान, या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा करावी अशा मागणीचे एक निवेदन हजारो नागरिकांनी आज सकाळी तहसीलदार यांना दिले आहे.

भाग्यश्री सुरेश घाडगे (वय १६, रा. अंबड) असे मयत मुलीचे नाव आहे. या प्रकरणात संशयित सोहम मिंधर, बळीराम मिंधर, दुर्गेश चित्रे व एका महिलेविरुद्ध (सर्व रा.अंबड) अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गत एक वर्षापासून सोहम मिंधर, दुर्गेश चित्रे हे भाग्यश्री हिला तिचे फोटो, व्हिडीओ काढून सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत होते. त्यामुळे भाग्यश्रीच्या तक्रारीवरून सोहमविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल केलेला तो गुन्हा मागे घ्यावा, यासाठी बळीराम मिंधर व त्यांच्या पत्नीने भाग्यश्री व तिचे वडील सुरेश घाडगे यांना घरी येऊन धमकावले होते. त्यामुळे भाग्यश्रीने मंगळवारी सकाळी गळफास लावून आत्महत्या केल्याचे सुरेश घाडगे यांनी अंबड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. सुरेश घाडगे यांच्या तक्रारीनुसार वरील चौघांविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात भा. न्या. संहिता कलम १०८, ३ (५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि गुरले करीत आहेत. घटनेनंतर पोनि जाधव, सपोनि गुरले, ठुबे, पोउपनि नरोडे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

नातेवाईक आक्रमक
मुलीच्या पार्थिवाचे शवविच्छेदन झाल्यानंतर या प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी, सर्वांना अटक करावी अशी मागणी लावून धरत नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर पोलिसांनी कारवाईचे आश्वासन देत मयत मुलीच्या वडिलांची तक्रार घेतली. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेवून अंत्यसंस्कार करण्यात आले. रूग्णालय परिसरात मयत मुलीच्या पालकांसह नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा पाहून अनेकांचे डोळे पानावले होते.

पिडीतेस न्याय देण्यासाठी नागरिकांचे निवेदन
अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणीने रोड-रोमियोंच्या छळास कंटाळून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणी फरार आरोपींना त्वरीत अटक करुन कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करत तहसीलदारांना हजारोंच्या सह्याचे निवेदन आज सकाळी देण्यात आले आहे.

Web Title: 'Withdraw crime against child', girl ends life after threats from relatives; Anger among citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.