लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लाईट फिटींगसह इतर किरकोळ कामे रखडल्याने शहरातील जिल्हा स्त्री रूग्णालयाची कोट्यवधी रूपये खर्च करून बांधण्यात आलेली नवीन इमारत धूळ खात उभी आहे. कार्यरत ६० खाटाच्या रूग्णालयात दैनंदिन साधारणत: २५० हून अधिक महिला, बाल रूग्ण उपचार घेतात. मात्र, येथे ४९ जणांचीच टीम कार्यरत असून, कामाचा अतिरिक्त ताण कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांवर पडत आहे. विशेषत: सोनोग्राफी मशीन नसल्याने गरोदर महिलांना जिल्हा रूग्णालयात किंवा टायप केलेल्या खाजगी रूग्णालयाकडे धाव घ्यावी लागत आहे.शहरातील जिल्हा स्त्री रूग्णालयात प्रसुतीसाठी शहरासह परिसरातील महिला मोठ्या प्रमाणात येतात. ६० खाटांचे हे रूग्णालय असले तरी बाह्य रूग्ण विभागात दैनंदिन साधारणत: १०० ते १३० च्या जवळपास महिला रूग्ण येतात. तर अंतररूग्ण विभागात १०० ते १२० महिला रूग्ण दाखल असतात. शिवाय नवजात बालकांच्या कक्षात ८ ते १० बालके उपचार घेतात. मात्र, ६० खाटानुसारच अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे कार्यरत आहेत. परिणामी येथे कार्यरत अधिकारी, कर्मचाºयांवर कामाचा ताण वाढला आहे. आपसूकच याचा कमी-अधिक प्रमाणात फटका रूग्ण आणि नातेवाईकांना बसतो. ही बाब लक्षात घेऊन ६० खाटाच्या स्त्री रूग्णालयाला १०० खाटांची मंजुरी मिळविण्यासाठी साधारणत: २००४ पासून प्रयत्न सुरू करण्यात आले होते. शासकीय, प्रशासकीय पातळीवरील कागदोपत्री प्रक्रियेनंतर कोट्यवधी रूपये खर्चाच्या या इमारतीचे गतवर्षी काम पूर्ण झाले. सहा महिन्यांपूर्वी युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटनही करण्यात आले.उद्घाटन झाले असले तरी लाईट फिटींगसह इतर किरकोळ कामे रखडल्याने ही कोट्यवधी रूपये खर्च करून उभारलेली रूग्णालयाची इमारत, निवासस्थानांच्या इमारती धूळ खात उभ्या आहेत. १०० खाटानुसार अधिकारी, कर्मचारी भरण्याची प्रक्रिया शासकीय पातळीवरील आहे. त्यामुळे ही पदे केव्हा भरली जाणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. विशेष म्हणजे येथील सोनोग्राफी मशीन बंद पडून अनेक वर्षे झाली आहेत. रूग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हा रूग्णालयात सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय एका खाजगी रूग्णालयाशी टायअप करण्यात आल्याने अल्प दरात सोनोग्राफी करून दिली जात आहे. मात्र, काही वर्षापासून नवीन सोनोग्राफी मशीन मिळालेली नाही. महिला रूग्णांची होणारी धावपळ थांबविण्यासाठी या रूग्णालयात नवीन सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून देण्याची गरज असून, नवीन इमारतीचा वापरही सुरू करण्याच्या हालचाली होणे अपेक्षित आहे.जुन्याच फर्निचरचा होणार वापर१०० खाटाच्या नवीन इमारतीत जुन्याच इमारतीलतील फर्निचरचा वापर करावा लागणार आहे. वाढीव ६० खाटा, टेबल, खुर्ची, कपाटासह इतर साहित्य, औजारांची मागणी वरिष्ठ स्तरावर करण्यात आली.मात्र, लागू असलेली आचारसंहिता आणि पुढील विधानसभा निवडणुका पाहता हे साहित्य वेळेवर मिळण्याची शक्यता कमी आहे. परिणामी जुन्याच फर्निचरचा वापर करावा लागणार आहे.
स्त्री रुग्णालयाची इमारत धूळ खात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:46 AM