महिलांनी दृढनिश्चयी होऊन कठीण प्रसंगांना सामोरे जावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:14 AM2019-03-11T00:14:52+5:302019-03-11T00:15:17+5:30
महिला कोठेच कमी नाहीत, असे प्रतिपादन नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : महिलांनी दृढनिश्चियी होऊन कठीण प्रसंगांना सामोरे जावे, महिला कोठेच कमी नाहीत, असे प्रतिपादन नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी केले. खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित महिला मेळाव्यात ‘त्या’ बोलत होत्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिध्द सामाजिक अभ्यासक प्रा. बी. वाय. कुलकर्णी यांची उपस्थिती होती. अनिता माळगे, उद्योजक कमल कुंभार, कृषिभूषण भगवान काळे, एस.व्ही. सोनुने, योगेश माळगे, प्रियंका विभुते, योगेश गोडसे, योगेश बोंगाळे, कृषिभूषण छाया मोरे, सीताबाई मोहिते, संजीवनी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
कृषिभूषण भगवान काळे मार्गदर्शन करताना म्हणाले की, महिला दिन ही केवळ औपचारिकता नसून तो महिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असल्याचे प्रतिपादन केले. प्रा.बी.वाय. कुलकर्णी यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना महिलांना आपला विकास करावयाचा असल्यास दुसऱ्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये, शिक्षण हा केवळ दागिना झाला असून, त्याचा वापर योग्य प्रकारे करावा, मुलींना मरू देऊ नका, महिला मुळातच दृढनिश्चयी व खंबीर असून, महिला कधीही आत्महत्या करीत नाहीत, असे प्रतिपादन केले.
महिला दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सुभद्रा जाधव, रंजनाथ भोसले, विद्या काळे, वंदना हजारे, सपना सातपुते, दीपाली मगर, या कर्तबगार महिलांचा नगराध्यक्षांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
याचबरोबर मराठवाडा शेती सहाय्य मंडळात कार्यरत सर्व महिला मजुरांना साडी भेट देवून गौरविण्यात आले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संगीता गायकवाड यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.