दहा सुट्यांमुळे कामकाज ढेपाळले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:31 AM2018-11-26T00:31:10+5:302018-11-26T00:31:45+5:30
या एका महिन्यात दहा सुट्यांमुळे प्रशासकीय कामकजावर त्याचा विपरित परिणाम झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास ही एक प्रचलित म्हण आहे, त्याचा अनुभव सध्या सर्व जनता अनुभवत आहे. आता तुम्ही म्हणाल, संस्कृतीने घालून दिलेले सणवारही साजरे करू नयेत का ? तर तो मुद्दा निराळा आहे. या एका महिन्यात दहा सुट्यांमुळे प्रशासकीय कामकजावर त्याचा विपरित परिणाम झाला आहे.
जालना जिल्ह्यातील जवळपास सर्वच शासकीय कार्यालये ही रेल्वे वेळापत्रकानुसार चालात. जालन्यातील नागरी सुविधांचा बोलबाला, मनोरंजनाच्या साधनाचा अभाव शैक्षणिक मागासलेपण यामुळे जालन्यात अधिकारी आणि कर्मचारी वर्ग थांबण्यास तयार नसतो. जालना जिल्ह्यातील बहुतांश अधिकारी आणि कर्मचारी एक तर औरंगाबाद किंवा परभणी येथून अप-डाऊन करतात. त्याचा परिणाम प्रशासकीय कामकाजावर होत आहे. कुठल्याही कार्यालयात गेल्यास चार वाजेनंतर कर्मचाऱ्यांना रेल्वेचे वेध लागतात. हे कर्मचारी सकाळी किमान ११.३० वाजेच्या सुमारास कार्यालयात येतात. आणि लगेचच रेल्वेचे लोकेशन मोबाईलवर तपासून त्यानुसार कामकाजाच्या वेळा ठरतात.
पंधरा दिवसांपूर्वी तर ज्या रेल्वेने सर्व कर्मचारी येतात ती रेल्वे मुळातच औरंगाााद रेल्वे स्थानकावर चक्क दहा वाजता आणि नंतर दीड तास म्हणजे ही रेल्वे जालना रेल्वेस्थानकात पावणे बाराच्या सुमारास आली होती. त्यावरून शासकीय कार्यालयात हे कर्मचारी कधी पोहोचले असतील याचा विचार न केलेलाच बरा. गेल्या काही दिवसांमध्ये अप-डाऊनचे फॅड वाढले आहे. याला कारण हे कर्मचारी मुंबईत तर यापेक्षाही जास्त दूर अप-डाऊन करावे लागते असे देतात. मात्र तेथील अधिकारी, कर्मचारी ही कार्यालयाची वेळ पाळतात हे विसरून चालणार नाही.
एकूणच जिल्ह्यातील जवळपास ४० पेक्षा अधिक विभागातून अधिकारी, कर्मचारीे अप-डाऊन करत असल्याचे दिसून येते.
जालना : अनेक शिक्षण संस्थांची तीच गत
येथील शासकीय तंत्र निकेतनसह अन्य शासकीय संस्थामध्ये तर एकाच कारमध्ये सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी वर्ग येतात. लागणारे भाडे हे ज्याची कार असेल त्यांना ते विभागून देतात. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे वास्तव आहे. मात्र याकडे कधी ना शिक्षणधिका-याने ना कधी कोणत्या लोकप्रतिनिधीने लक्ष दिल्याचे दिसून येत नाही.
नोव्हेंबरमध्ये चार रविवार तसेच दुसरा आणि चौथा श्निवारसह दिवाळी, पाडवा आणि भाऊबीज तसेच गुरूनानक जयंती, ईद आदी सुट्यांमुळे या महिन्यात दहा सुट्या लागून आल्याने कामाकजावर परिणाम झाला आहे. यामुळे पाणी टंचाई तसेच टँकर सुरू करण्यासह बोंडअळीचे अनुदान मिळावे म्हणून लोकांची कामे खोळंबली आहेत.
बायोमेट्रिक नावाला
विविध शासकीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा बसवली आहे. मात्र ती केवळ नावालाच आहे. पूर्वी या बायोमेट्रिकवर थंब केल्यानुसारच कर्मचाºयांचे वेतन होत असत. मात्र आता याची माहिती ना लेखा विभागाला असते ना. नियोजन त्यामुळे शासकीय कर्मचा-यांसाठी कार्यालय म्हणजे आओ-जाओ घर तुम्हारा अशी अवस्था झाली आहे.