संत जगनाडे महाराजांचे कार्य प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 12:40 AM2019-01-04T00:40:04+5:302019-01-04T00:40:43+5:30
जगतगुरू संतश्रेष्ठ श्री. तुकाराम महाराजांची गाथा लिहून काढणारे श्री संत जगनाडे महाराज यांचे कार्य प्रेरणादायी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जगतगुरू संतश्रेष्ठ श्री. तुकाराम महाराजांची गाथा लिहून काढणारे श्री संत जगनाडे महाराज यांचे कार्य प्रेरणादायी आहे. म्हणून प्रत्येकाने त्यांच्या कार्याचे अनुकरण करून आपले जीवन सुखकर करावे, असा हितोपदेश हभप. भगवान महाराज आनंदगडकर यांनी दिला आहे.
श्री. संत संताजी जगनाडे महाराज यांची गुरूवारी ३१९ व्या पुण्यतिथी निमित्त तेली समाजाच्या वतीने विविध उपक्रमांनी त्यांना अभिवादन करण्यात आले. यानिमित्त समाजाच्यातर्फे कन्हैयानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या कीर्तनात प. पू. भगवान महाराज आनंदगडकर बोलत होते.
प्रारंभी सकाळी ९ वाजता मोदीखाना भागातील तेली पंचायत वाडा येथून संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेस रथामध्ये विराजमान करण्यात आले. त्यानंतर रथयात्रेस प्रारंभ करण्यात आला. ही रथयात्रा शहरातील मोदीखाना, आर. पी. रस्ता, नेहरु रस्ता मार्गे काद्राबाद, नळगल्ली, पाणी वेस येथून पंचमुखी महादेव मंदिराच्या प्रांगणात विसर्जित करण्यात आली.
श्री संत जगनाडे महाराजांची रथ यात्रा रस्त्यावरुन मार्गस्थ होणार असल्याने समाजातील सुवासिनींनी आपापल्या घरासमोर सडा रांगोळ्यांसह फुलांची उधळण करुन मार्ग सजविलेला होता. रथयात्रेसोबत वेद शाळेचे विद्यार्थी टाळ- मृदंगाच्या सुमधूर आवाजात भक्तिगीते गात होती.
या रथयात्रेचे खास आकर्षण हे विद्यार्थी ठरले होते. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.