जालना : गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एका महाविद्यालयीन युवकाला दरोडा प्रतिबंधक पथकाने (एडीएस) जेरबंद केले. ही कारवाई सोमवारी सकाळी बदनापूर शहरातील वाल्ला रोडवर करण्यात आली. या प्रकरणी दोघाविरूध्द बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ऋषीकेश राजू जऊळकर (२१ रा. शेंद्रा एमआयडीसी गंगापूर जहाँगीर अष्टविनायक वसाहत ता. औरंगाबाद) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. ऋषीकेश जऊळकर याच्याकडे गावठी पिस्टल असून, तो औरंगाबादहून बदनापूर मार्गे उज्जैनपुरीकडे बसने जात असल्याची माहिती दरोडा प्रतिबंधक पथकाचे (एडीएस) प्रमुख पोनि यशवंत जाधव यांना मिळाली होती. या माहितीवरून पोनि जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन पंचांसह सोमवारी सकाळी बदनापूर शहरातील वाल्ला रोडवर सापळा रचला. त्यावेळी खाटीक गल्ली जवळून वाल्ला रोडने पायी जाणाऱ्या ऋषीकेश जऊळकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची पंचासमक्ष तपासणी केली असता त्याच्याकडे ४० हजार रूपये किंमतीचे गावठी पिस्टल आढळून आले. ती पिस्टल जप्त करून पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर सदरील पिस्टल मित्राची असल्याचे त्याने सांगितले. दुसऱ्या युवकाचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. या प्रकरणी दरोडा प्रतिबंधक पथकातील पोहेकॉ ज्ञानदेव नागरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ऋषीकेश जऊळकरसह दोघाविरूध्द बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि यशवंत जाधव, पोहकॉ ज्ञानदेव नागरे, नंदू खंदारे, किरण चव्हाण यांच्या पथकाने केली.