लोकमत न्यूज नेटवर्क
भडगाव : तालुक्यातील वाडे येथील यशवंत बंकट पाटील या शेतकऱ्याच्या टेकवाडे बु ता. चाळीसगाव येथील शिवारातील १ एकर ऊसाला शाॅर्टसर्कीटने आग लागून ऊस जळुन खाक झाल्याची घटना घडली. ही घटना दि. ७ रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली.
यावेळी शेजारील शेतकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतल्याने उर्वरीत ऊसाचे पिक वाचविण्यात यश मिळाले आहे. प्रशासनाने पिक नुकसानीचा पंचनामा तात्काळ करावा. संबंधितांनी तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
भडगाव तालुक्यातील वाडे येथील शेतकरी यशवंत बंकट पाटील यांचे वाडे शिवाराला लागूनच टेकवाडे बु. शिवारात शेत आहे. शेतात त्यांनी ३ एकर ऊसाचे पिक लावलेले आहे. ऊसाच्या शेतातून विजतारा गेल्या आहेत. या वीजतारांवर पक्षांचे थवे बसल्याने शाॅर्टसर्कीट झाले. शाॅर्टसर्कीटने ऊसाला अचानक आग लागली. एकच आरडाओरड झाल्याने शेजारील शेतांमधील शेतकऱ्यांनी मदतीसाठी एकच धाव घेतली. या आगीत १ एकर ऊस जळून खाक झाला. मात्र उर्वरीत २ एकर ऊसाचे पिक वाचविण्यात शेतकऱ्यांना यश आले.
घटनास्थळी विज वितरणचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भेट देउन पाहणी केली. महसूल प्रशासनाकडे कळवूनही नुकसानीचा पंचनामा करण्यात आलेला नाही. या शेतकऱ्याचे दिड लाखांचे नुकसान झाले असुन महसूल प्रशासनाने तात्काळ नुकसानीचा पंचनामा करावा, अशी मागणी होत आहे.