जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर म्हणून प्रतिक्षेत असलेल्या मोहाडी रुग्णालयात शंभर खाटांच्या ऑक्सिजन पाईपलाईनचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम पूर्ण हो्ऊन साधारण ५ एप्रिलपासून या शंभर खाटा उपलब्ध होणार आहे. दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी या रुग्णालयात पाहणी केली. या ठिकाणी जंबो कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार असून ८०० रूग्णांवर उपचाराची व्यवस्था करण्याचे नियेाजन असल्याची माहिती त्यांनी दिली.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रुग्णालयाच्या व्यवस्थेबाबत आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, महापौर जयश्री महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सुभाष राऊत, बाजार समिती सभापती कैलास चौधरी, जि. प. सदस्य पवन सोनवणे, नगरसेवक अमर जैन आदींची उपस्थिती होती.
तिन्ही सेवा उपलब्ध
या हॉस्पीटलमध्ये जनरल बेड, ऑक्सीजन बेड आणि व्हेंटीलेटर्स या तिन्ही प्रकारातील रूग्ण सेवा उपलब्ध राहणार आहे. प्राथमिक स्तरावर शंभर बेडच्या ऑक्सिजन पाईपलाईनचे काम सुरू करण्यात आले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावरील रुग्णांचा भार या ठिकाणी प्रत्येक रूग्णाला अद्ययावत उपचार मिळणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
पाळधीत वीस बेड
पाळधीच्या आरोग्य केंद्राच्या इमारतीत वीस बेडच्या ऑक्सिजन पाईपलाईनचे काम पूर्णत्वास येत असून या ठिकाणी मनुष्यबळ नियुक्तीचे आदेशही काढण्यात आले आहे. ५ एप्रिल रोजी हे बेडही रुग्णसेवेत उपलब्ध असतील, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली.