लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव जिल्ह्यात मंगळवारी ११९१ नवे कोरोना बाधित आढळून आले आहे. तर ९२९ जणांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर मंगळवारी तब्बल १४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात ३७ वर्षांच्या पुरूषाचा देखील समावेश आहे. लग्नसमारंभाबाबत जिल्हा प्रशासनाने नवे आदेश जारी केले आहेत. केवळ २० जणांच्या उपस्थितीत लग्न करता येणार आहे. तसेच लाॅन व मंगल कार्यालयांना परवानगी नाकारली आहे.
कमी वयातील रुग्णांचे मृत्यू होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच मंगळवारी लॉकडाऊन संपत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जळगाव जिल्हा प्रशासनाने ३१ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत कडक निर्बंधाचे नवे आदेश जारी केले आहे. त्यात लग्न सोहळे साजरे करण्यासाठी हॉल, मंगल कार्यालय लॉन यांची परवानगी नाकारण्यात आली आहे. तर लग्न २० लोकांच्या उपस्थितीत घरीच करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. तसेच नाईट कर्फ्यु रात्री १० ते सकाळी सात वाजेपर्यंत लागु करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने सायंकाळी उशिरा हे आदेश दिले.