कोरोना उपाययोजनांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १२० कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:24 AM2021-06-16T04:24:19+5:302021-06-16T04:24:19+5:30
जळगाव : कोरोना संसर्गाच्या उपाययोजनांसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीमधून १२० कोटी रुपयांच्या निधीचे नियोजन करण्यात आले आहे. यापैकी ३९ ...
जळगाव : कोरोना संसर्गाच्या उपाययोजनांसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीमधून १२० कोटी रुपयांच्या निधीचे नियोजन करण्यात आले आहे. यापैकी ३९ कोटी ५५ लाख ४२ हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यतादेखील देण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्या अखत्यारित येणाऱ्या यंत्रणांसाठी हा निधी खर्च केला जाणार आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वच घटकांवर परिणाम होत आहे. गेल्या वर्षीदेखील कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यासाठी मिळणाऱ्या वार्षिक विकास योजनांच्या निधीमध्ये ६७ टक्के कपात करण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यासाठी एकूण मंजूर ३७५ कोटींचा निधीपैकी केवळ १२३ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला सुरुवातीला मिळाला. त्यापैकीदेखील ५० टक्के निधी हा कोरोना उपाययोजना करण्यासाठी प्राधान्याने उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आता यंदादेखील तशीच परिस्थिती उद्भवू पाहत आहे. यावेळी जिल्ह्यासाठी ४०० कोटी रुपये वार्षिक योजनांसाठी मंजूर झाले आहे. यापैकी ३० टक्के निधी कोरोना उपाययोजनांसाठी ठेवण्यात यावा, अशा सूचना यापूर्वी नियोजन विभागाने दिल्या होत्या.
सुधारित तरतूद १२० कोटींची
जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय संस्थांच्या औषधी, यंत्रसामग्री, साधन सामग्री, बांधकामे, देखभाल दुरुस्ती, विस्तारीकरण व बळकटीकरण इत्यादीसाठी २०२१-२२ या वर्षाकरिता ६९ कोटी ९ लाख निधीची तरतूद आहे. मात्र कोरोना उपाययोजना व बळकटीकरणासाठी शासनाने १२० कोटी मर्यादेत निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागासाठी १२० कोटी रुपयांची सुधारित तरतूद करण्यात आली आहे.
जिल्हा वार्षिक योजनांच्या निधीत कपात
कोरोना उपाययोजनांसाठी निधीची सुधारित तरतूद करण्यात आल्याने जिल्हा वार्षिक योजनेतील निधी कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य शासकीय कार्यालयांकडील योजना व जिल्हा परिषदेकडील योजनांच्या अर्थसंकल्पीय निधीत कपात करण्यात येणार आहे.
साडेतेरा कोटींहून अधिक निधी डीन यांच्या अखत्यारित योजनांसाठी
कोरोना उपाययोजना करण्याच्या दृष्टीने जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीमधून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्या अखत्यारित येणाऱ्या योजनांसाठी १३ कोटी ५५ लाख १२ हजार रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अखत्यारित योजनांसाठी २५ कोटी
जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अखत्यारित येणाऱ्या योजनांसाठी २५ कोटी ९ लाख ५८ हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आयुर्वेद महाविद्यालयाच्या अधिष्ठांतांच्या अखत्यारित योजनांसाठी ९० कोटी, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या अधिष्ठांतांच्या अखत्यारित योजनांसाठी ९० कोटी ७२ रुपयांच्या निधीलादेखील प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
ऑक्सिजनवर अधिक भर
कोरोनाची दुसरी लाट आता जवळपास ओसरली आहे. मात्र या लाटेदरम्यान ऑक्सिजनचा तुटवडा चिंतेचा विषय ठरला होता. त्यामुळे तिसरी लाट आलीच तर दक्षता म्हणून ऑक्सिजनच्या उपलब्धतेवर भर दिला जात आहे. त्यामुळे आता कोरोना उपाययोजनांसाठी तरतूद केलेल्या निधीमधूनदेखील ऑक्सिजन उपलब्धतेला प्राधान्य दिल्याचे दिसून येते. सुधारित तरतुदीतून मेडिकल प्राणवायू, नायट्रस ऑक्साइड वायू, लिक्विड ऑक्सिजन, ऑक्सिजन जनरेशन प्लॅंट, ऑक्सिजन स्टोरेज टॅंक, ड्युरा सिलिंडर, मल्टी पॅरा मॉनिटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, बालरुग्णांसाठी पेडियाट्रिक व्हेंटिलेटर्स, आरटीपीसीआर रुग्ण तपासणी प्रयोगशाळा विस्तारीकरण इत्यादी कामे तसेच उपचारासाठी लागणारी विविध औषधे, इंजेक्शन, रसायने, यंत्रसामग्री, साधनसामग्री व अनुषंगिक बाबींच्या खरेदीसाठी मंजुरी देण्यात आली आहे.