जळगाव : जिल्ह्यात बुधवारी एकाच दिवसात १२ हजार १५१ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. यात ११ हजार ५ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला, तर ११४७ नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीच्या दुसऱ्या डोसला प्राधान्य दिले जात आहे. मात्र, मे महिन्यात लसीकरण केंद्रांवर दिसून येत असलेली गर्दी आता कमी झाली आहे.
शहरातील अनेक लसीकरण केंद्रांवर नागरिक जाऊन लस घेत आहेत. तेथे कोणतीही गर्दी दिसून येत नाही. काही दिवस आधीपर्यंत शहरातील काही केंद्रांवर टोकन दिले जात होते. मात्र, आता गर्दीच नसल्याने ही टोकन पद्धत देखील बंद करण्यात आली आहे.
शासनाने १८ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचे जाहीर केल्यावर केंद्रांवर मोठी गर्दी उसळली होती. मात्र, नंतरच्या काळात शासनाने लसीकरण केंद्रांवरील गर्दी कमी करण्यासाठी आणि लसींचा तुटवडा असल्याने १८ ते ४५ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद केले. त्यामुळे लस घेण्यासाठी फक्त ४५ वर्षांवरील नागरिकांनाच लस दिली जाऊ लागली. त्यातही दुसऱ्या डोसला प्राधान्य दिले जात होते. मात्र, आता आता जिल्ह्यात दुसऱ्या डोसपेक्षा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे.