जळगाव : महापौर ललित कोल्हे यांनी रविवारी भाजपात प्रवेश केल्यानंतर सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्याकडे सादर केला. महापौरांसह भाजपामध्ये प्रवेश केलेल्या १३ नगरसेवकांनीही नगरसेवकपदाचे राजीनामे आयुक्तांकडे सोपविले. यात खान्देश विकास आघाडी, मनसे व राष्टÑवादी कॉँग्रेसच्या नगरसेवकांचा समावेश आहे.भाजपामध्ये आतापर्यंत १५ नगरसेवकांनी प्रवेश केला असून, या सर्व नगसेवकांच्या प्रवेशावेळी भाजपाकडून राजीनामे लिहून घेण्यात आले होते. सोमवारी दुपारी महापौर ललित कोल्हे यांनी आयुक्तांची भेट घेतली व महापौरपदाचा राजीनामा सोपविला. त्यानंतर त्यांचे वडील व मनसेचे नगरसेवक विजय कोल्हे यांनी देखील राजीनामा सादर केला.महापौर ललित कोल्हे, भारती सोनवणे व विजय कोल्हे यांच्या व्यतिरिक्त पक्षांतर केलेल्या इतर नगरसेवकांनी आयुक्तांकडे राजीनामा न देता टपालाद्वारे राजीनामे पाठविले. मात्र आयुक्तांनी ते नाकारत प्रत्यक्ष भेटून राजीनामे द्यावे अशा सूचना दिल्या. त्यानंतर सिंधुताई कोल्हे यांना वगळता सर्व नगरसेवकांनी आपले राजिनामे दिले. पण कोल्हे या काही कारणास्तव येवू शकल्या नाही, मात्र आयुक्तांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला.
महापौरांसह १३ नगरसेवकांचे राजीनामे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 6:11 AM