जळगाव जिल्ह्यातील १३ तालुके दुष्काळाच्या दुसऱ्या निकषात पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 01:14 PM2018-10-12T13:14:39+5:302018-10-12T13:15:48+5:30
एरंडोल, धरणगाव अपात्र
जळगाव : केंद्र शासनाच्या दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार राज्य शासनाने दुष्काळासाठी तयार केलेल्या पद्धतीच्या पहिल्या निकषात पात्र ठरलेल्या १२ तालुक्यांमध्ये पारोळा तालुक्याचा समावेश होऊन एकूण १३ तालुके गंभीर दुष्काळाच्या दुसºया निकषात पात्र ठरले आहेत. त्यामुळे या तालुक्यांमधील १० टक्के गावांमध्ये प्रत्यक्ष शेतांमध्ये जाऊन माहिती भरण्याची (सत्यमापन) प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी बैठकीत दिले.
जिल्ह्यात पावसाने मोठ्या प्रमाणावर खंड पाडल्याने व ६३.८ पाऊस झालेला असल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट घेणार असून अनेक ठिकाणी पिके हातची गेली आहेत. त्यामुळे जिल्हा दुष्काळी जाहीर करण्याची मागणी होत असताना केंद्र शासनाच्या दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार राज्य शासनाने पद्धती तयार केली असल्याने त्याअनुषंगानेच निकष लावून दुष्काळ घोषीत करण्यात येणार आहे. त्यातील सप्टेंबर अखेर ७५ टक्के पेक्षा कमी पाऊस झालेले १२ तालुके दुष्काळाच्या पहिल्या निकषात (ट्रिगर) पात्र झाले आहेत, तर पारोळा, एरंडोल व धरणगाव हे तालुके अपात्र ठरले. मात्र दुसºया निकषात त्यात आणखी पारोळा तालुक्याचा समावेश झाला आहे. एकूण १३ तालुके गंभीर दुष्काळाच्या निकषात पात्र ठरले आहेत. दुसºया निकषासाठी वनस्पती निर्देशांक, जलनिर्देशांक, पेरणीक्षेत्र आदी निकषांपैकी किमान तीन निकषांमध्ये पात्र ठरलेल्या तालुक्यांना पात्र धरण्यात आले आहे.
सत्यमापन प्रक्रिया आजपासून
१० टक्के गावांमध्ये प्रत्यक्ष शेतांमध्ये जाऊन माहिती भरण्याची (सत्यमापन) प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी बैठकीत दिले.
गुरूवारी याबाबत पात्र ठरलेले अमळनेर, पारोळा, भडगाव, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, रावेर, यावल या सर्व तालुक्यांमधील तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी आदी उपस्थित होते. त्यांना त्यांच्या तालुक्यांमधील १० टक्के गावे निवडून देण्यात आली.