बनावट एटीएम कार्डद्वारे परस्पर १३ हजार लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 11:29 PM2021-05-20T23:29:51+5:302021-05-20T23:31:14+5:30
बनावट एटीएम कार्ड तयार करून तरूणाच्या खात्यातील १३ हजार रूपये काढून घेतल्याचा प्रकार टाकळी प्र.चा. येथे उघडकीस आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : बनावट एटीएम कार्ड तयार करून तरूणाच्या खात्यातील १३ हजार रूपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार तालुक्यातील टाकळी प्र.चा. येथे उघडकीस आला आहे. तरूणाच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की , निलेश अजबराव पाटील (३३ रा. टाकळी प्र.चा. भडगाव रोड ता.चाळीसगाव) या तरूणाने चाळीसगाव शहरातील एका खासगी बँकेत खाते आहे. १७ मे रोजी सकाळी ८.४० ते ८.४१ वाजेच्या दरम्यान बँकेच्या खात्याशील जोडलेल्या डेबीट कार्डचे बनावट नवीत कार्ड तयार करून निलेश पाटील यांच्या खात्यातील १३ हजार रूपये परस्पर काढून घेतल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी निलेश पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
धानोऱ्यातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न
धानोरा, ता. चोपडा : ग्रामपंचायतीच्या व्यापारी संकुलात असलेले एटीएम चोरांनी फोडण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी हे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी सकाळी लक्षात आली. एटीएम न फुटल्यामुळे चोरांच्या हाती काही लागले नाही; पण एटीएमचे काही प्रमाणात नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच अडावदचे एपीआय किरण दांडगे यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली. दीड वर्षातील ही दुसरी घटना आहे. हे एटीएम दीड वर्षात चोरट्यांनी दोन वेळा फोडले. दोन्ही वेळा रक्कम चोरण्यात असफल झाले. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात येत
आहे.