जळगाव जिल्ह्यात ३ वर्षात २५६८ अपघातात १३१५ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:08 PM2018-02-19T12:08:12+5:302018-02-19T12:10:09+5:30
जळगाव जिल्ह्यातील रस्त्यांची दैना, समांतर रस्त्यांचा अभाव आणि वाहतूक नियमांची पायमल्ली
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.१९ : २०१५ ते २०१७ या तीन वर्षात जिल्ह्यात २ हजार ५६८ अपघात झाले असून त्यात १ हजार ३१५ जणांचा मृत्यू तर २ हजार ६८६ वाहनधारक जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
रस्ते व महामार्गाची झालेली दैना, समांतर रस्त्यांचा अभाव, भरधाव वाहन चालविणे, वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली यासह विविध कारणांमुळे शहर व ग्रामीण भागात दररोज अपघात होत आहे. राष्टÑीय महामार्ग क्रमांक सहा व औरंगाबाद महामार्ग तर मृत्यूचा सापळा बनला आहे.
२०१६ मध्ये ८ ३७ अपघात
२०१६ मध्ये जिल्ह्णात एकूण ८३७ अपघात झाले. त्यात ४२५ जणांचा मृत्यू तर ७७९ जण जखमी झाले. त्यात ५६१ जणांना गंभीर दुखापत झाली. याही वर्षी मे मध्ये ९६ अपघात झाले त्यात ६० जणानी जीव गमवला.
मे महिन्यात सर्वाधिक अपघात
२०१५, २०१६ या वर्षाप्रमाणेच २०१७ मधील मे महिन्यात सर्वाधिक ८६ अपघात झाले, त्यात ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०१७ या वर्षात एकूण ८३१ अपघात झाले त्यात ४२२ जणांचा मृत्यू तर ९३८ जण जखमी झाले.
२०१५ मध्ये सर्वाधिक अपघात
गेल्या तीन वर्षात जिल्ह्णात किती अपघात झाले याबाबत माहिती घेतली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. २०१५ मध्ये सर्वाधिक ९०० अपघात झाले. त्यात ४६८ जणांचा मृत्यू तर ९६९ जण जखमी झाले. जानेवारी ते डिसेंबर या १२ महिन्यातील प्रत्येक महिन्यात किमान ५० च्या वर अपघात झाले आहेत. मे महिन्यात सर्वाधिक ११२ अपघात झाले.