जळगाव जिल्ह्यात १८८६ शेततळे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:47 PM2018-07-10T12:47:48+5:302018-07-10T12:50:23+5:30
जलयुक्त शिवार
जळगाव : जलयुक्त शिवार अंतर्गत जिल्ह्यास देण्यात आलेल्या २ हजार शेततळ््यांच्या उद्दिष्टांपैकी जिल्ह्यात आतापर्यंत १८८६ शेततळे पूर्ण झाली असल्याची माहिती सोमवारी झालेल्या जलयुक्त शिवारच्या कामांचा आढावा बैठकीत देण्यात आली.
जिल्ह्यात सुरु असलेल्या जलयुक्त शिवारच्या कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीस जळगाव वन विभागाचे उपवनसंरक्षक दिगंबर पगार, यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक संजय दहिवले, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, जिल्हा अधक्षीक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, लघुसिंचनचे (जलसंधारण) कार्यकारी अभियंता राजेंद्र नंदनवार, लघुसिंचनचे (जिल्हा परिषद) कार्यकारी अभियंता नाईक, कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
राज्य शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम असलेल्या जलयुक्त शिवार अभियानातंर्गत जिल्ह्यात सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी या वेळी संबंधित यंत्रणांना दिले.
यंदा करण्यात येणा-या कामांची घेतली माहिती
जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये ४०९३ कामे प्रस्तावित होती. त्यापैकी ३६९२ कामे पूर्ण झाली असून ४०१ कामे प्रगतीवर असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी २०१६-१७ मधील कामांचादेखील आढावा घेण्यात आला तर २०१८-२९ मध्ये करण्यात येणाºया कामांच्या नियोजनांची माहिती जिल्हाधिकाºयांनी संबंधित यंत्रणांकडून जाणून घेतली. आतापर्यंत १८८६ शेततळे पूर्ण झाली असली तरी उर्वरित शेततळ्यांची कामे लवकर मार्गी लावण्याच्या सूचनाही याप्रसंगी जिल्हाधिकाºयांनी दिल्यात.
जिओ टॅगिंग वेळेत करा
ज्या भागात अद्याप पावसाचे प्रमाण कमी आहे त्या भागातील प्रगतीत असलेली कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक असून त्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत. तसेच जी कामे पूर्ण झाली आहे, त्यांचे जिओ टॅगिंग वेळेत करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात.