५० रुपयांची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 10:58 PM2019-12-31T22:58:36+5:302019-12-31T22:58:54+5:30

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ललित या सदरात लिहिताहेत जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ.संजीवकुमार सोनवणे...

2 rupees | ५० रुपयांची गोष्ट

५० रुपयांची गोष्ट

Next

माझ्या प्रश्नावर ते जोरदार आवंढा गिळत म्हणाले, ‘गुर्जी आम्हनी कपी देवले प्यारी व्हयी गयी. आखरीलेबी जाताना ती सांगे, सरस्ना पन्नास रुपया देवाना शेतस!’
रोजच्या सारखी शाळेची मधली सुट्टी झाली आणि आठवीतली एक बारीकशी चुणचुणीत मुलगी सरळ सत्राधिऱ्यांच्या कार्यालयात शिरली, मी तिच्याकडे पाहिलं तेव्हाशी ती रडवेल्या चेहºयाने म्हणाली, ‘सर, मी आता घरी कशी जाऊ?’
मी म्हणालो, ‘कसं म्हणजे? तुला काय प्राब्लेम आहे ते नीट सांग बेटा!’
सर, माझी पास संपली आहे. आज आईकडे पाच रुपये होते ते तिने भाड्याला दिले होते. आज पास निघेल असं वाटलं होतं पण पास काढायला पैसेच नव्हते. मग आता घरी कसं जाऊ?’
मी तिची अडचण ओळखली. मधली सुट्टी झाली की अनेक मुलंमुली शिक्षकांकडे कधी चॉकलेटसाठी तर कधी काही वस्तू घेण्यासाठी परतीच्या बोलीवर पैसे मागतात, ते परत येण्याची गॅरंटी नसते. तरीही माणुसकीच्या दृष्टीने काही शिक्षक देतातही. मुलं माझ्याकडेही मागायला येतात, ते मी लिहून ठेवतो पण बहुतेक मुलं परत करत नाहीत म्हणून त्यांना बोली करून मी देतोही. शिवाय मुलं मुली काही पण कारण सांगून पैसै घेतात, हा अनुभव लक्षात घेऊन तीही पासचं नाव सांगून खोटं बोलत असावी, असं वाटत होतं, पण तिचा रडवेला चेहरा पाहून ती खरं बोलत असावी, असंही वाटलं म्हणून मी तिला ५० रुपये देत तिला म्हणालो, ‘कधी आणशील?’
‘उद्या आणेल सर नक्की.’ तिने शाश्वती दिली. मी निश्चिंत झालो.
असेच चार पाच दिवस निघून गेले. एक दिवस वर्गावर फेरी मारताना त्या मुलीने पैसे परत केले नसल्याचे माझ्या लक्षात आले. वर्गात विचारणा केली तर ती मुलगी पैसे घेऊन गेल्यापासून शाळेतच आली नसल्याचे समजले. मी वर्गाला उद्देशून त्या मुलीविषयी आणि तिने घेतलेल्या ५० रुपयांवरून संतापात बोललो. त्या मुलीने खोटे बोलून फसवल्याचा मला राग आला होता. हे पैसेही अक्कलखाती जमा झाल्याचा कयास मी करून घेतला. मुलगी खेड्यातली होती. खेड्यावरच्या बºयाचशा मुली शाळेत अनियमित असतात. कधी कधी त्या फक्त परीक्षेला येतात नाहीतर येतच नाहीत. ही अनेक शाळांची परिस्थिती आहे. पालक मुलींना शाळेत पाठवण्यास तयार नसतात. त्यांना शेतातल्या कामाला जुंपले जाते किंवा लहान वयातच लग्न करून दिले जाते. पण मला भेटायला आलेली ही मुलगी चुणचुणीत वाटली होती, ती असं खोटे बोलून पैसे मागेल असं न वाटल्यानेच मी तिला पैसे दिले होते. ती का आली येत नाही याचा तपास वर्ग शिक्षकाला करायला सांगितला. त्यांनी तो केलाही. तिचे आईवडील कुठल्यातरी पजावावर, वीटभट्टीवर कामाला असल्याने संपर्क होऊ शकत नसल्याचा खुलासा मिळाला. बरेच दिवस ही ५० रुपयांची गोष्ट माझ्या मनात घर करून राहिली. प्रश्न ५० रुपयांचा नव्हता; पण एक तर मला मुलांचे मन चांगले ओळखता येते, या माझ्या गोड गैरसमजुतीला तडा गेला होता आणि अबोध, अल्लड दिसणारी ही मुलगी अशी खोटं बोलली याचा राग येत होता. पण वर्षभरात ही गोष्ट मी विसरुनही गेलो.
जून महिन्यात अंगानं काडं असणारं जोडपं मला विचारत आॅफिसमध्ये शिरले, ‘गुर्जी, आम्ही कल्पनाना मायबाप शेतस!’
मी म्हणालो, ‘कोण कल्पना?’
‘मांघना सालले आठवीले व्हती, तुमनापासून पासनंगुन्ता पन्नास रुपया ली गयथी ती कल्पना!’
माझ्या डोळ्यासमोर ती बारीक शेलाटी चुणचुणीत मुलगी उभी राहिली.
मी म्हणालो, ‘मग मी आते काय करू?’
‘तुमी तिले पास काढाले पन्नास रुपया दीसन गह्यरा उपकार करात सर!’
‘हो पण ती पैसै घेऊन गायब झाली तिने पास तर काढलीच नाही पण वर्षभर शाळेतही आली नाही.’ मी जरा नाराजीने बोललो. तसे ते विनवणीच्या स्वरात म्हणाले, ‘गुर्जी, चूक भूल माफ करजात, त्या दिन तुमनापासून पन्नास रुपया लिसन त्यानामाधून भाडं काढीसन आमनी कपी घरले ऊनी आनी आजारी पडनी. गह्यरा इलाज करात सर... तिना मेंदूले गाठ व्हयेल व्हती.
सांगता सांगता ते हुंदके देऊन रडू लागले. रडता रडता पन्नास रुपयाची नोट मला देत म्हणाले, ‘गुर्जी ह्या तुमना पन्नास रुपया. आथरूणवर पडेल पोरगी म्हणे, आमना सरना पन्नास रुपया देवाना शेतस, देवाना शेतस!’
‘आता कशी आहे कल्पना?’
माझ्या प्रश्नावर ते जोरदार आवंढा गिळत म्हणाले, ‘गुर्जी आम्हनी कपी देवले प्यारी व्हयी गयी. आखरीलेबी जाताना ती सांगे, सरस्ना पन्नास रुपया देवाना शेतस!’
हे ऐकून मी जागच्या जागी थिजलो. मला भयंकर अपराध केल्यासारखे वाटले. तिने पाठवलेल्या त्या पन्नास रुपयात मला त्या मुलीचा रडवेला चेहरा दिसत होता, जणू काही ती म्हणत होती, सर, मी घरी कशी जाऊ? माझ्याकडे पास काढायला पैसे नाहीत! माझ्या विश्वासाच्या परीक्षेत ती खरंच ‘पास’ झाली होती...
-डॉ.संजीवकुमार सोनवणे, धरणगाव

Web Title: 2 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.