५५ वर्षीय महिलेने जिद्दीने केली व्याधीवर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 08:31 PM2020-04-12T20:31:01+5:302020-04-12T20:31:10+5:30
प्राणायमही करतात नियमीतपणे
भुसावळ : म्हणतात ना इच्छा असेल तर मार्ग सापडेल व जिद्द असेल तर सर्व काही शक्य आहे, असाच काहीचा प्रत्यय भुसावळ येथील प्रा. सरोज शुक्ला यांचा आला आहे. वय वर्ष ५५ असताना त्या लागोपाठ १०८ सूर्यनमस्कार काढतात व दररोज दहा किलोमीटर रनिंग करतात. यापूर्वी त्यांना दुखण्यामुळे सहज चालणे देखील त्रासदायक होते मात्र आता त्या सहज धाऊ लागल्या आहे.
मूळच्या मुंबईच्या असलेल्या व लग्नानंतर भुसावळ येथे स्थायिक झालेल्या प्रा. सरोज शुक्ला या अध्यापनासह कौटुंबिक जबाबदारी सांभाळतात. काही वर्षे आनंदात गेली. परंतु २०१२-१३ या शैक्षणिक वर्षात अचानक पायांच्या स्नायूंचे दुखणे बळावले. काही दिवस दुर्लक्ष केले परंतु पुढे गुडघेदुखी तीव्र झाली. त्यामुळे पायऱ्या चढणे व चालणे देखील त्रासदायक होत गेले. अशा परिस्थितीत महाविद्यालयातील वरच्या मजल्यावरील मिटींगला उपस्थिती आदी कामांवर परिणाम होत गेला.
अशात स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा विचारही आला व त्या दृष्टिकोनातून कागदपत्रांची जुळवाजुळव केली परंतु या परिस्थितीत मात करण्यासाठी योगाभ्यास करायचा विचारही आला.
...आणि व्याधी पळाली
व्याधीवर मात करण्यासाठी योग मार्गदर्शक ज्योती सोनवणे व गोपाळ सोनवणे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. इच्छा होती की सूर्यनमस्कार व इतर योगासने सहजपणे करावीत. परंतु सुरुवातीला अवघड जात होते. नियमितपणे जिद्दीने सूर्यनमस्कार सुरू ठेवले व बघता बघता शंभरावर सूर्यनमस्कार काढू लागल्यात. त्यावेळेस इच्छेनुसार त्यांनी १५ जानेवारी २०१९ रोजी अलाहाबाद येथील कुंभमेळ्यात गंगा नदीच्या तीरावर सलग १०८ सूर्यनमस्कार काढले .
हळूहळू धावणे वाढतच गेले
त्यानंतर पुढील ध्येय डोळ्यासमोर ठेवले ते म्हणजे धावण्याचे व फिटनेस कायम राखण्याचे. त्यासाठी शहरातील अस्थिरोग तज्ञ डॉ. तुषार पाटील यांचे मार्गदर्शन घेतले. त्यांच्या सल्ल्यानुसार भुसावळ स्पोर्ट्स अँन्ड रनर्स असोसिएशनच्या नियमित सरावांना उपस्थित राहतांना लक्षात आले ते म्हणजे एक किलो मीटर धावणे देखील अवघड आहे .परंतु पती प्रमोद शुक्ला यांचे प्रोत्साहन व प्रा. प्रवीण फालक यांचे मार्गदर्शन यामुळे हळूहळू धावायला सुरुवात केली व बघता बघता दहा कि.मी.सहज धावायला लागल्या.
प्राणायमही करतात नियमीतपणे : आता सध्या लॉकडाऊनमुळे धावणे बंद असले तरी घरी राहून पुन्हा योगाभ्यास व सूर्यनमस्कार यांचा सराव सुरू केला आहे. दररोज एका श्वास मध्ये ५६ मिनीटात १०८ सूर्यनमस्कार त्या घालतात. तसेच कपालभारती ,प्राणायाम नियमित करीत आहेत. व्यायामापासून दूर असलेल्या सर्वांसाठी त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.