लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत सोमवारी जिल्ह्याने एकत्रित लसीकरणात २० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. यात १५ लाखांपेक्षा अधिक नागरिकांचा पहिला डोस तर पाच लाख नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याची वाटचाल सेफ झोनकडे सुरू आहे. शिवाय दुसरीकडे रुग्ण व मृत्यू घटल्यानेही दिलासा कायम आहे.
जिल्ह्यात सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ४ हजारांपर्यंत लसीकरण झालेले होते. शनिवारी एक लाखांवर नागरिकांनी लस घेतली. त्यानंतर रविवारी सुटी असल्याने केंद्र बंद होते. त्यानंतर पुन्हा सोमवारी दिवसभरात लसीकरण झाले. यामुळे जिल्ह्यातील एकूण लस घेणाऱ्यांची संख्या २० लाखांवर पोहोचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील २७ लाख लोकसंख्या ही १८ वर्षांपुढील या लसीकरणाच्या उद्दिष्टासाठी ग्राह्य धरली जात आहे. यातील ४ लाख लोकांचे दोनही डोस झाल्याने आता पहिल्या व दुसऱ्या डोसमधील हे अंतर कमी करण्यावर भर द्यावा लागणार आहे. मध्यंतरी पहिला डोस बंद करून केवळ दुसऱ्या डोसला प्राधान्य दिले जात होते. सोमवारी जिल्ह्यातील १२१ केंद्रांवर लसीकरण सुरू होते.
शहर आघाडीवर
जिल्हाभरात जळगाव शहरात सर्वाधिक ९० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. यात एकत्रित लसीकरणाचा आकडा हा ३ लाख ३९ हजार ७०३ वर पोहोचला आहे. यात २२३६५० लोकांनी पहिला तर १ लाख १६ हजार ५३ लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. शहरात महापालिकेचे ८ तसेच रोटरी व रेडक्रॉस हे जिल्हा रुग्णालयाचे दोन केंद्र कार्यरत आहेत. तर चेतनदास मेहता रुग्णालयात कोव्हॅक्सिन उपलब्ध असते.
तरुणाई पुढे
१८ ते ४४ वयोगट: ८९९१४४
४५ ते ६० : ५९७६७३
६० वर्षांपुढे : ४९६०१९