पाडळसरे प्रकल्पासाठी २२०९ कोटींची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:16 AM2021-03-05T04:16:49+5:302021-03-05T04:16:49+5:30

निम्न तापी प्रकल्प (पाडळसरे) निम्न तापी प्रकल्पाची टप्पा १ ची प्रकल्पीय सिंचन क्षमता २३३२८ हे. असून प्रकल्पीय पाणीसाठा २६२.५८ ...

2209 crore required for Padalsare project | पाडळसरे प्रकल्पासाठी २२०९ कोटींची गरज

पाडळसरे प्रकल्पासाठी २२०९ कोटींची गरज

Next

निम्न तापी प्रकल्प (पाडळसरे)

निम्न तापी प्रकल्पाची टप्पा १ ची प्रकल्पीय सिंचन क्षमता २३३२८ हे. असून प्रकल्पीय पाणीसाठा २६२.५८ दलघमी आहे. प्रकल्पाचे उजव्या तीरावरील माती धरणाचे काम पूर्ण झाले असून डाव्या तीरावरील माती धरणाचे काम ७० टक्के झाले आहे. तर धरणाचे बांधकाम सांडवा मुर्धा पातळी १३९.२४ मी.पर्यंत झाले आहे. प्रकल्पाचे स्थापत्य कामे, वक्राकार दरवाजे, उर्वरित भूसंपादन व पुनर्वसन कामे वेळेत (जून २०२६) पूर्ण होण्यासाठी दरवर्षी ३५० ते ४०० कोटींची गरज आहे. शासनाच्या ९ सप्टेंबर २०१९ च्या पत्रान्वे पीएमकेएसवाय व बीजेएसवाय या दोन्ही योजनेत समाविष्ट प्रकल्प वगळून उर्वरित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी रु. १५ हजार कोटीचे दीर्घ मुदतीचे कर्ज घेण्यास मान्यता प्राप्त झाली असून या प्रकल्पांमध्ये निम्न तापी प्रकल्पाचा समावेश आहे.

प्रकल्पाचे ठिकाण : अमळनेर तालुक्यात मौजे पाडळसे गावाजवळ तापी नदीवर.

कामाला सुरुवात: एप्रिल १९९९ पासून या प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाली असून प्रकल्पाचे ४३ टक्के काम पूर्ण झाले आहे.

प्रकल्पाचा एकूण खर्च: ११२७.७४ कोटींची सुप्रमा प्राप्त असून २७५१ कोटीची चतुर्थ सुप्रमा मान्यतेची कार्यवाही सुरू आहे. प्रकल्पावर आतापर्यंत ५४१.७३ कोटी रुपये खर्च झाला असून अजून २२०९.३२ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे.

शेळगाव बॅरेज

शेळगाव बंधाऱ्यामुळे ४.५ टीएमसी इतक्या पाण्याचा साठा होणार आहे. यामुळे यावल तालुक्यातील ९१२८ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून हजारो शेतकऱ्यांना ‍यांचा लाभ होणार आहे. १९९७-९८ मध्ये या प्रकल्पाचे मूल्य १९८.०५ कोटी इतके होते. २०१६ साली याला ९६८.९७ कोटी रुपयांची द्वितीय सुधारित मान्यता प्रस्तावित करण्यात आली होती. १३ जानेवारी २०२१रोजी झालेल्या बैठकीत यालाच राज्यशासनाची मान्यता मिळाली असून याचमुळे या प्रकल्पाला वाढीव निधी मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

प्रकल्पाचे ठिकाण: शेळगाव बॅरेज हा मध्यम प्रकल्प मौजे शेळगाव, ता.जळगाव या गावापासून दीड किमी अंतरावर तापी नदीवर होत आहे.

कामाला सुरुवात: ५ डिसेंबर १९९९ पासून या प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाली. त्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे.

प्रकल्पाचा एकूण खर्च: ९६८.९७ कोटींची सुप्रमा आहे. त्यावर आतापर्यंत सुमारे ६५० कोटींचा निधी आतापर्यंत खर्च झाला आहे. तर उर्वरित कामासाठी आणखी सुमारे ३१८ कोटींच्या आसपास निधीची आवश्यकता आहे.

———————————

बोदवड उपसा सिंचन योजना

हतनूर धरणाच्या बुडीत क्षेत्रातून पावसाळ्यात पुराचे वाहून जाणारे पाणी मुक्ताईनगर गावाजवळील खामखेडा पुलाजवळ पूर्णा नदीच्या काठावरून इनटेक चॅनल व जॅकवेल बांधून उपसाद्वारे १९८.५४ दलघमी पाणी उचलण्याची व ते पाणी जॅकवेलमध्ये टाकून तेथून जामठी साठवण तलावात नेऊन साठविण्याची बोदवड उपसा सिंचन योजना आहे. बोदवड परिसर सिंचन योजनेमुळे १६३.६९ दलघमी पाणीसाठा होणार असून त्याद्वारे ५३४४९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील ३३ हजार ६६८ हेक्टर तर बुलढाणा जिल्ह्यातील १९ हजार ७८१ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

प्रकल्पाचे ठिकाण : मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा पुलाजवळ पूर्णा नदीच्या काठावर. ईनटेक चॅनल व जॅकवेल बांधून उपसाद्वारे १९८.५४ दलघमी पाणी उचलून जुनोने साठवण तलावात नेऊन साठविणे.

कामाला सुरुवात: २३ मे २०१७

प्रकल्पाचा एकूण खर्च: प्रकल्पाच्या ३७६३ कोटींच्या कामास सुप्रमा मिळाली असून आतापर्यंत ५०३.६४ कोटी रुपये खर्च झाला आहे. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आणखी ३२५९.३६ कोटींच्या निधीची गरज आहे.

——————————————————

वरखेडे लोंढे बॅरेज

वरखेडे लोंढे (बॅरेज) मध्यम प्रकल्पाचा फायदा चाळीसगाव व भडगाव तालुक्याला होणार आहे. या प्रकल्पाद्वारे ३५.५८२दलघमी पाणीसाठा होणार असून ७९१९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. निधी वेळेवर उपलब्ध झाल्यास जून २०२१ पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

प्रकल्पाचे ठिकाण : गिरणा नदीवर मौजे वरखेडे बु.।। ता.चाळीसगाव या गावापासून १ किमी व चाळीसगावपासून २५ किमी अंतरावर आहे.

कामाला सुरुवात: ८ फेब्रुवारी २०१३

प्रकल्पाचा एकूण खर्च: प्रकल्पास ५२६ कोटीची सुप्रमा प्राप्त असून आतापर्यंत ३२१.७६ कोटी रुपये खर्च झाला आहे. तर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणखी २७४.०० कोटींच्या निधीची आवश्यकता आहे.

शेतकरी प्रतिक्रिया

१)शेळगाव प्रकल्पामुळे परिसरात सिंचनाला फायदा होणार आहे. कोरडवाहू शेतीचे स्तर पालटून बागायतीचे शेतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढेल परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला मदत होईल -नीलेश सुरेश रोटे, नशिराबाद

२)प्रकल्प पूर्ण त्यामुळे परिसरातील भूगर्भातील जलपातळीचा प्रमाण वाढेल त्याचा लाभ शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होईल. -चंद्रकांत शरद चौधरी

३)नशिराबादप्रकल्प पूर्ण त्यामुळे परिसरातील जलस्तर वाढेल परिणामी शेतकऱ्यांनाही उत्पन्नावर वाढ होऊन आर्थिक स्तर उंचावणार आहे. -कल्पेश रमेश पाटील, नशिराबाद

————————

पाडळसरे, शेळगाव बॅरेज यासह अन्य प्रकल्पांसाठी निधीची मागणी पाठविली आहे. त्यामुळे शासनाकडून त्यासाठी पुरेसी तरतूद होऊन काम वेळेत पूर्ण होईल.

-प्रशांत मोरे, अधीक्षक अभियंता, तापी पाटबंधारे महामंडळ.

Web Title: 2209 crore required for Padalsare project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.