जळगाव : खाजगी आराम बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन दोन्ही वाहनांच्या चालकासह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, इतर सात जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी पहाटे दोन वाजता जळगावनजीक नशिराबाद येथील कपूर पेट्रोल पंपासमोर घडली. या अपघातामुळे महामार्गावर दोन्ही बाजुकडील वाहतूक चार तास खोळंबली होती. तब्बल तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या.
महेंद्रा ट्रॅव्हल्सची बस यवतमाळहून सुरतकडे तर ट्रक हा भावनगर (गुजरात) मधून अमरावतीकडे जात होता. मृतांमध्ये ट्रकचालक राजाराम गेनाराम चौधरी ( २६, रा. बावडी ता.चौटल जि.बारमेर, राजस्थान), निर्भयसिंग प्रतापसिंग कंवर (३९, रा पलासिया ता.जाडोन, जि.उदयपूर, राजस्थान) व आराम बसचा चालक शंकर पटेल (रा. राजस्थान) यांचा समावेश आहे. या अपघातात विनोद राठोड (रा.भांबोरा ता.घाटंजी, यवतमाळ), राधा विनोद राठोड (३०), पूजा विनोद राठोड, नारायण विनायक तांबोळे (४५), गजानन चावके (रा.दिग्रस, यवतमाळ), संतोष अग्निहोत्री, (दोघे रा.दिग्रस, यवतमाळ), ट्रॅव्हल्समधील वाहक अतिष पवार (३८) रा.खामगाव, जि.बुलडाणा) हे जखमी आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.