चोपडा : शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यातील अपहार झालेले बोअरवेलचे दोन ट्रक मध्यप्रदेश राज्यातील शिवनी जिल्ह्यातील चिखली या गावातून अत्यंत शिताफीने जप्त केले. संबंधित गुन्ह्यातील आरोपीस चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अटक करून आणले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चोपडा येथील सहयोग कॉलनीमधील रहिवासी व बोअरवेल व्यावसायिक वल्लभ पटेल यांच्याकडून आरोपी राजाराम चंद्रवंशी याने मौखिक करारानुसार मासिक भाडेतत्त्वावर बोअरवेलचे दोन ट्रक व्यवसायाकरिता नेले. मात्र, मौखिक करारानुसार आरोपीने फिर्यादी वल्लभ पटेल यांना कुठल्याही प्रकारचे देणे केले नाही. म्हणून फिर्यादी वल्लभ पटेल यांनी आरोपी राजाराम चंद्रवंशी यास संपर्क केला असता तो टाळाटाळ करीत होता. असे निदर्शनास आले असता फिर्यादी वल्लभ पटेल हे स्वतः आरोपीच्या मध्यप्रदेश येथील राहत्या घरी गेले असता त्याने ठरलेले भाडे व फिर्यादीच्या मालकीचे असलेले बोअरवेलचे दोन ट्रक देण्यास नकार दिला. उलट माझेच तुमच्यावर पैसे निघतात, असे सांगून परतवून लावले.
त्यामुळे फिर्यादी यांनी सदर बाब ही चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली. १५ जून रोजी गुन्हा रजि. २०९/२०२१ भादंवि कलम ४०६, ४२० प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक संतोष पारधी यांच्याकडे देण्यात आला. या तपासकामी शहर पोलीस स्टेशनची पथके मध्यप्रदेश येथील शिवनी जिल्ह्यातील चिखली या गावी गेली. तेथे आरोपी राजाराम चंद्रवंशी व वल्लभ पटेल यांच्या मालकीचे बोअरवेलचे दोन ट्रक असा एकूण ३५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीला दोन दिवसाच्या कोठडीनंतर चोपडा येथे आणण्यात आले. आता आरोपीला पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून, अटक केली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गोरे व चोपडा पोलीस उपविभागीय अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली सदर गुन्ह्याचे तपासाधिकारी पोलीस नाईक संतोष पारधी तसेच पोलीस नाईक योगेश पालवे ,पो. काँ. सुभाष सपकाळ, होमगार्ड स्वप्नील बाविस्कर व राहुल सावकारे यांनी केली.