लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना प्रतिबंधक लसीकरणात लसीचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर शुक्रवारी दुपारपर्यंत कोविशिल्ड लसीचे ३५ हजार डोस उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी दिली. दरम्यान, गेल्या तीन दिसांपासून लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने ज्या केंद्रांवर लस काही प्रमाणात शिल्लक आहेत त्याच केंद्रांवर लसीकरण होत होते. शहरात तर हे लसीकरण पूर्णपणे ठप्प होते.
काेविशिल्ड लसीचा साठा शून्यावर गेला हेाता. तर कोव्हॅक्सिनचे ३२०० डोस उपलब्ध होते. हे डोसही एका दिवसात संपतील, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, लसीचे ३५ हजार डोस घेऊन गाडी निघाली असून ती शुक्रवारी दुपारपर्यंत येणार असल्याचे डॉ. जमादार यांनी सांगितले.
शहराला हवा मोठा साठा
शहरातील सहा केंद्रांवर सरासरी १ हजाराच्या आसपास रोज लसीकरण होत होते. त्यादृष्टीने शहराला रोज किमान १२ हजार डोस इतका लसीचा साठा उपलब्घ होणे आवश्यक आहे. यात सहाही केंद्रांवर तुटवडा असून नागरिकांना परत जावे लागत आहेत. यात दुसरा डोस असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. ४५ वर्षावरील सर्वच नागरिकांना लस देण्याचा चौथा टप्पा सुरू असून जिल्ह्यात ही संख्या १४ लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अद्यापही मोठा साठा जिल्ह्याला लागणार आहे.
जिल्ह्यात एकूण केंद्र १३३
सुरू असलेले केंद्र : २३ यात आरोग्य केंद्र व खासगी रुग्णालयांचा समावेश आहे.
१७ केंद्रांवर गेल्या दोन दिवसांपासून एकही लसीकरण झालेले नाही
पहिला डोस : १६८४४४
दुसरा डोस : १९३४२