लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांनी मनपाची थकीत भाड्याची रक्कम न भरल्याने, मंगळवारी छत्रपती शाहू महाराज मार्केटमधील ४ दुकाने मनपाकडून सील करण्यात आली आहेत. मनपा उपायुक्त प्रशांत पाटील व संतोष वाहुळे यांच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. या मार्केटमधील १२ दुकानदारांकडून ५८ लाख रुपयांचीही वसुली मनपाकडून करण्यात आली.
मनपाकडून मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडून थकीत भाडे वसुल करण्याची मोहीम काही दिवसांपासून थांबली होती. मात्र, मंगळवारपासून पुन्हा या मोहिमेला सुरुवात झाली आहे. मंगळवारी छत्रपती शाहू महाराज मार्केटमध्ये जाऊन मनपाच्या पथकाने गाळेधारकांना थकीत भाड्याची रक्कम भरण्याचा सूचना मनपा अधिकाऱ्यांनी दिल्या. त्यापैकी ठरावीक गाळेधारकांनीच मनपाकडे थकीत रक्कम भरली. मात्र, चार गाळेधारकांनी मनपाकडे एकही रुपयाची रक्कम न भरल्याने, ती चारही दुकाने मनपाकडून सील करण्यात आले.
गाळेधारकांकडून विरोध
मनपा प्रशासनाकडून गाळे सील करण्यात आल्यानंतर, गाळेधारकांनी मनपा अधिकाऱ्यांचा विरोध केला, तसेच रेडीरेकनरची रक्कम कमी करूनच भाडे वसुलीची मागणी केली. मात्र, मनपा उपायुक्त प्रशांत पाटील व संतोष वाहुळे यांनी राज्य शासनाने ५ पट दंड माफ करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार आता उर्वरित रक्कम कमी करून, थकीत भाडे भरावेच लागेल, अशा सूचना उपायुक्तांनी दिल्या. त्यावर काही गाळेधारकांनी विरोध केला. मात्र, मनपा अधिकाऱ्यांनी गाळेधारकांची कोणतीही मागणी मान्य न करत आपली कारवाई केली.
आतापर्यंत ५ कोटींची वसुली
मनपा प्रशासनाने मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडून आतापर्यंत ५ कोटींची वसुली केली आहे. मंगळवारीही शाहू मार्केटमधून ५८ लाखांची वसुली करण्यात आली. दरम्यान, आगामी काही दिवसांत ही मोहीम अधिक तीव्र करण्यासोबतच आता गाळे सील करण्याची कारवाईही करण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.