५२३ विद्यार्थ्यांनी अजूनही केले नाही प्रवेश निश्चित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:17 AM2021-07-30T04:17:19+5:302021-07-30T04:17:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई प्रवेशांसाठी लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चितीची अंतिम मुदत उद्यावर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई प्रवेशांसाठी लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चितीची अंतिम मुदत उद्यावर येवून ठेपली आहे. मात्र, अजूनही ५२३ विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये जावून आपले प्रवेश निश्चित केलेले नसल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, मुदत संपल्यानंतर लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांना कुठलीही संधी मिळणार नसून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.
बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, म्हणजेच शिक्षण हक्क कायद्यानुसार, २५ टक्के जागांवरील प्रवेश निश्चितीसाठी ३१ जुलै ही मुदतवाढ देण्यात आली आहे. ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने झाली होती. अजूनही ज्या पालकांनी शाळांमध्ये जाऊन प्रवेश निश्चित केलेला नाही. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश निश्चित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ सुरू होऊन एक महिन्याहून अधिक कालावधी उलटला आहे. तरीदेखील गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षीही आरटीई प्रवेशाच्या प्रक्रियेला विलंब झालेला आहे.
अशा आहेत जागा...
जळगाव जिल्ह्यातील २९६ शाळांमधील ३ हजार ६५ जागांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. या जागांसाठी जिल्हाभरातून ५ हजार ९३९ अर्ज शिक्षण विभागाला प्राप्त झाले होते. त्यापैकी २ हजार ६९५ विद्यार्थ्यांना ऑनलाइन लॉटरी लागली होती. या विद्यार्थ्यांना ३१ जुलैपर्यंत प्रवेश निश्चितीची मुदत देण्यात आली होती.
आतापर्यंत २१७२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित
लॉटरी लागलेल्या २ हजार ६९५ विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत २ हजार १७२ विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये जावून आपले प्रवेश निश्चित केले आहे. परंतु, प्रवेश निश्चितीची अंतिम मुदत ही उद्यावर येवून ठेपलेली असताना, अजूनही ५२३ विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळांमध्ये जावून प्रवेश निश्चित केलेले नाही. दरवर्षी आरटीई प्रवेशाच्या जागा रिक्त राहतात. यंदाही ही परंपरा कायम राहिल का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.