कंत्राटी कर्मचाऱ्याला महावितरणकडून मदत
जळगाव : काही महिन्यांपूर्वी विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या परिवाराला महावितरणतर्फे आर्थिक मदत करण्यात आली. मयताच्या परिवाराला योग्य ती आर्थिक मदत मिळण्याबाबत महावितरणचे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर यांनी कामकाज पाहिले. ही मदत मिळाल्याबद्दल मयताच्या कुटुंबीयांनी महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता फारूख शेख, अरुण शेलकर, व्यवस्थापक उद्धव कळवे, कार्यकारी अभियंता रमेश पवार यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले.
जमात-ए-इस्लामी हिंदतर्फे किराणा मालाचे वाटप
जळगाव : शहरातील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या गरजू नागरिकांना जमात-ए-इस्लामी हिंदतर्फे किराणा मालाचे वाटप करण्यात आले. गरीब आणि अनाथ लोकांपर्यंत ही मदत पोहोचविण्यात आली. यासाठी जमात-ए-इस्लामी हिंदचे अध्यक्ष सोहेल अमीर शेख यांनी परिश्रम घेतले.
गटारी तुंबल्याने आरोग्य धोक्यात
जळगाव : नवीपेठेत अनेक ठिकाणी अनियमित साफसफाई अभावी मोठ्या प्रमाणावर गटारी तुंबल्या आहेत. यामुळे ऐन कोरोना काळात साथीचे आजार निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी मनपा प्रशासनाने या ठिकाणी नियमित साफसफाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
रेल्वे प्रशासनातर्फे कोरोना जनजागृती मोहीम
जळगाव : जळगाव रेल्वे प्रशासनातर्फे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन आदी प्रकारच्या सूचना करण्यात येत आहेत, तसेच रेल्वे स्टेशनवरवरही जनजागृतीचे फलक लावण्यात आले आहेत, तर सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचेही सांगण्यात येत आहे.
कोरोनामुळे तिकीट वेडिंग मशीन बंद
जळगाव : रेल्वे स्टेशनवर बसविण्यात आलेले तिकीट वेडिंग मशीन कोरोनामुळे बंद करण्यात आले आहेत. या मशीनच्या माध्यमातून कोरोना संसर्ग पसरण्याची शक्यता असल्याने, या मशीन बंद ठेवण्यात आल्या असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. जळगाव स्टेशनवर दोन ठिकाणी या मशीन बसविण्यात आल्या आहेत.