सुविधा : भुसावळ विभागातून १७ हजार ३३ टन मालाची वाहतूक
१७ हजार टन मालाची वाहतूक
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शेतकरी बांधवांच्या कृषीमालाला इतर राज्यांतील बाजारपेठांमध्ये जादा भाव मिळून, त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या किसान रेल्वेच्या नुकत्याच १०० फेऱ्या पूर्ण झाल्या असून, यातून भुसावळ रेल्वे प्रशासनाला सहा कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. १७ हजार ३३ टन मालाची वाहतूक या किसान रेल्वेद्वारे करण्यात आली आहे.
गेल्यावर्षी ७ ऑगस्टपासून भारतातील पहिली किसान रेल्वे नाशिक स्टेशनजवळील देवळाली ते दानापूरदरम्यान धावली. या किसान रेल्वेमुळे भुसावळ विभागातील नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ या भागांतील शेतकऱ्यांना बिहार राज्यातील दानापूरपर्यंत आपला भाजीपाला, फळे व इतर मालाची वाहतूक करणे सोयीचे झाले आहे. परराज्यात कांदा, लिंबू, द्राक्ष, पेरू , संत्री व इतर भाजीपाल्याला जास्त भाव मिळत असल्याने, मोठ्या संख्येने शेतकरीबांधव या गाडीने परराज्यात आपल्या मालाची वाहतूक करीत आहेत. विशेष म्हणजे, रेल्वे प्रशासनाने ज्या ठिकाणाहून शेतकरी मालाची वाहतूक करतील, त्या ठिकाणच्या जवळील रेल्वेस्टेशनवरही ही किसान रेल्वे पाठविण्याची सुविधा रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. तसेच खासगी वाहतुकीपेक्षा अत्यंत कमी दरात शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक होत असल्याने शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या गाडीला मिळत आहे.
इन्फो :
आतापर्यंत १७ हजार ३३ टन मालाची वाहतूक
या किसान रेल्वे मालगाडीच्या नुकत्याच १०० फेऱ्या पूर्ण झाल्या असून, आतापर्यंत या मालगाडीच्या माध्यमातून विविध भागातील शेतकऱ्यांनी १७ हजार ३३ टन इतक्या कृषी मालाची वाहतूक केली आहे. यातून रेल्वे प्रशासनाला ५ कोटी ९७ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. दरम्यान, या गाडीने नाशिक स्टेशनवरून सर्वाधिक कृषी मालाची वाहतूक झाल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
दररोज सेवा असल्यास शेतकऱ्यांचा फायदा
रेल्वे प्रशासनातर्फे गेल्यावर्षी कोरोनाकाळात सुरू केलेली ही किसान एक्सप्रेस सध्या मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी या तीनच दिवशी धावत आहे. त्यामुळे शेतकरीबांधवांना पुरेशी मालाची वाहतूक करण्यास अडचणी येत आहेत. जर रेल्वे प्रशासनाने दररोज किसान रेल्वेची सेवा सुरू ठेवली तर उत्पन्नात दुप्पटीने वाढ होणार असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.