७१ गावांमध्ये पिण्याचे पाणीच ठरू शकते आजाराचे कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:18 AM2021-07-14T04:18:51+5:302021-07-14T04:18:51+5:30
आनंद सुरवाडे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हाभरात दर महिन्याला प्रत्येक गावातील पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात येत असून, जून ...
आनंद सुरवाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाभरात दर महिन्याला प्रत्येक गावातील पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात येत असून, जून महिन्यात झालेल्या तपासणीत ७१ ठिकाणचे पाणी नमुने दूषित आढळून आले आहेत. एकत्रित १७०० ठिकाणचे नमुने संकलित करण्यात आले होते. त्यापैकी ४ टक्के नमुने हे दूषित आढळून आले आहेत. दरम्यान, यामुळे या गावांमध्ये आजारांचा धोका असल्याची भीती वर्तविण्यात येत आहे.
जलशुद्धीकरणाच्या बाबतीत आरोग्य विभागाकडून दक्षता घेतली जात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ज्या गावांमध्ये दूषित नमुने आढळून येतात त्या गावांमध्ये तातडीने उपाययोजना राबविल्या जातात. नमुने दूषित येण्याचे प्रमाण हे कमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, दूषित पाण्यामुळे विविध आजारांचा संसर्ग होत असतो, यातून साथीच्या आजारांचा फैलाव होण्याची शक्यता अधिक असते, यात डायरियाची मोठ्या प्रमाणात लागण होण्याची भीती असते, असेही काही डॉक्टरांचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेमार्फत या आजारांवर नियंत्रण म्हणून जलशुद्धीकरणासाठी आधी नमुने संकलित केले जातात व त्यानंतर त्यांची तपासणी करून त्यांचा अहवाल दिला जातो. यंदा ७१ ठिकाणचे नमुने दूषित आढळून आले आहेत.
तालुकानिहाय आढावा
नमुने आणि दूषित
अमळनेर १९९, ६
भडगाव ६७, ०
भुसावळ ५४, ०
बोदवड ५३, २
चाळीसगाव १६८, ७
चोपडा १३०, ४
धरणगाव ९१, ६
एरंडोल ८९, ३
जळगाव १२८, ६
जामनेर १७८, २
मुक्ताईनगर १००, ६
पाचोरा १९५, १२
रावेर १३२, ९
यावल ७८, ४
१७७१ एकूण नमुने तपासणी
७१ नमुने आढळले दूषित
रावेरात सर्वाधिक प्रमाण
रावेर : ६.८२
धरणगाव : ६.५९
मुक्ताईनगर : ६
सर्वच ठिकाणी तपासणी होत असल्याचा दावा
: जिल्हाभरात सर्वच ठिकाणी आरोग्य विभागाकडून जल नमुन्यांची तपासणी होत असते, असा दावा आरोग्य विभागाने केला आहे. यात शहरी भागातही तपासणी केली जाते.
: जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची संख्या ११४९ असून, यातील १७७१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.
: गेल्या वर्षभरात १९७०० नमुने संकलित करण्यात आले होते. त्यापैकी ७३२ नमुने हे दूषित आढळून आले आहेत.
: दर महिन्याला या जलनमुन्यांची तपासणी करून त्या-त्या गावांमध्ये उपायोजना राबविल्या जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आता परिस्थितीत सुधारणा
: पाणी नमुने दूषित आढळून येत असल्याचे प्रमाण कमी झाल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. कोरानाकाळातही नियमितप्रमाणेच नमुने तपासणी सुरू होती.
: ज्या गावांमध्ये दूषित पाणी आढळून आले आहे त्या गावांची यादी ग्रामपंचायत विभागाला दिली जाते. संबंधित ग्रामपंचायतीला याबाबत कल्पना देऊ. नक्की पाणी दूषित का झाले याची चाचपणी करून त्या त्या पातळ्यांवर उपाययोजना केल्या जातात.
: गळती दुरुस्त करण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या जातात, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी सांगितले.
आजारी पडायचे नसेल तर पाणी उकळून प्या
: दूषित पाण्यामुळे जलजन्य आजार होण्याचा धोका असतो. साधारण पावसाळ्यात याची अधिक लागण होण्याची शक्यता असते. अशा स्थितीत मान्सूनपूर्व व मान्सूनपश्चात अशा दोन पातळ्यांवर तपासण्या केल्या जातात.
: दूषित पाण्यामुळे कॉलरा, गॅस्ट्रो, डायरिया, टायफाॅइड यांची लागण होऊ शकते, तेव्हा अशा परिस्थितीत पाणी शुद्धच प्यावे, असा सल्ला डॉ. बी. टी. जमादार यांनी दिला आहे.
: आरोग्य विभागामार्फत शुद्ध पाणीपुरवठ्याच्याच सूचना असतात, ग्रामपंचायतींनी त्या दक्षतेने पाळणे गरजेचे आहे. कुठे कुणाला काही आढळून आल्यास कळवावे, तशा सूचना ग्रामपंचायतींना दिल्या जातात, असेही ते म्हणाले.