शिवाजीनगर ते सुरत रेल्वे गेटपर्यंत ७५ खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:18 AM2021-09-21T04:18:46+5:302021-09-21T04:18:46+5:30
सचिन देव लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात सर्वच मुख्य रस्त्यांची चाळण झाली असतांना, दुसरीकडे शहराला जोडणाऱ्या रस्त्यांचींही प्रचंड ...
सचिन देव
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात सर्वच मुख्य रस्त्यांची चाळण झाली असतांना, दुसरीकडे शहराला जोडणाऱ्या रस्त्यांचींही प्रचंड दुरवस्था झाली आहे. शहरातील अत्यंत वर्दळीचा असलेल्या शिवाजीनगर ते सुरत गेटपर्यंतच्या रस्त्याची `लोकमत` प्रतिनिधीने पाहणी केली असता, या रस्त्यावर लहान-मोठे ७५ खड्डे दिसून आले. खड्डयांसोबतच या रस्त्याच्या साईडपट्टयांचीही प्रचंड दुरवस्था झाली आहे. या ठिकाणाहून वाहन काढतांंना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत असल्याचे दिसून आले.
इन्फो :
रस्त्याच्या एका बाजूने ४५ खड्डे
शिवाजी नगरातील रिक्षा थांब्यापासून सुरत रेल्वे गेटकडे जातांना काही ठिकाणी रस्ता चांगला आहे. मात्र, साईडपट्टया उखडलेल्या आहेत. पुढे गेंदालाल मिल समोरील रस्त्यावर ठिकठिकाणी २० ते २५ फुटाच्या अंतरावर लहान -मोठे खड्डे पडलेले दिसून आले. या रस्त्यावर काही ठिकाणी पूर्णपणे डांबर निघाल्यामुळे, मातीचा रस्ता झालेला दिसून आला. गेंदालाल मिलच्या पुढे सालार नगर, दुध फेडरेशन व सुरत गेटपर्यंतच्या या रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्त्याच्या मधोमध तर काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूला खड्डे पडलेेले दिसून आले. काही ठिकाणी मोठे खड्डे झाल्यामुळे, वाहनधारकांनी मुरूम टाकला होता. मात्र, व्यवस्थितपणे मुरूम न टाकल्यामुळे खालीवर रस्ता झालेला दिसून आला. यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबत असल्याचे वाहनधारकांनी सांगितले. एकंदरीत एका बाजूच्या मार्गावर ४५ हून अधिक खड्डे दिसून आले.
इन्फो :
दुध फेडरेशन समोरच रस्ता उखडलेला
सुरतगेट कडून पुन्हा शिवाजी नगरकडे येतांना या रस्त्याची दुसरी बाजूही खड्डेमय झालेली दिसून आली. या रस्त्यावर दुध फेडरेशन समोर रस्ता उखडलेला दिसून आला. तसेच तीन ते चार ठिकाणी खड्डेही पडलेले दिसून आले. यामुळे वाहनधारकांना संथ गतीने वाहन चालवावे लागत आहे. तसेच रस्त्याच्या यापुढे शिवाजीनगरकडे येतांना ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले असून, यातून दगड-गोटे बाहेर आल्यामुळे वाहनधारकांची चांगलीच कसरत होत असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे सालार नगरपासून पुढे गेेंदालाल मिलच्या अलीकडील रस्त्याची साईडपट्टयांची बाजू पूर्णपणे उखडलेली दिसून आली. पावसामुळे या रस्त्याची अधिकच दुरवस्था झाली आहे. मनपा प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांमधुन होत आहे.
इन्फो :
रस्त्याच्या कामाची खडी इतरत्र पसरल्याने अपघाताचा धोका
मनपा प्रशासनातर्फे या रस्त्याच्या कामासाठी गेल्या काही महिन्यांपासून खडी टाकलेली आहे. मात्र, अद्यापही रस्त्याच्या कामाला सुरूवात केलेली नाही. मात्र, ही खडी अनेक ठिकाणी रस्त्यावर पसरली आहे. परिणामी यामुळे खडीवरून चाक गेल्यास, वाहन घसरण्याची किंवा टायर पंक्चर होण्याची शक्यता वाहनधारकांमधून वर्तविण्यात येत आहे. तसेच यामुळे रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.