लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : यावल तालुक्यातील वड्री तांडा येथील एका ८ महिन्याच्या बालकाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी पोहोचेपर्यंत मृत्यू झाला. या बालकाला कुपोषण आणि डिहायड्रेशन यामुळे यावल ग्रामीण रुग्णालयातून जीएमसीला पाठविण्यात आले होते. या ठिकाणी या बाळाची ब्रॉड डेथ नोंद करून त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट हेाणार आहे.
वड्री येथील आकाश जवारसिंग पावरा हा आठवर्षीय बालक गेल्या आठ दिवसांपासून आजारी होता. त्याला यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथील डॉक्टरांनी या बाळाची तपासणी करून तो कुपोषित असल्याचे तसेच त्याच्या शरीरात पाणी कमी असल्याचे सांगून त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविले होते. मात्र, जळगाव पोहोचेपर्यंत या बाळाचा मृत्यू झाला होता. हे बाळ जीएमसीला मृतावस्थेत आले होते, अशी माहिती बालरोग विभागप्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोसे यांनी सांगितले. दरम्यान, बाळाला कुपोषित म्हणूनच रेफर केल्याची माहिती यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. बी. बारेला यांनीही दिली. दरम्यान, बाळाच्या आईने रुग्णालयात आक्रोश केला होता. बाळाची तब्येत अतिशय कमकुवतच होती.
तीन वर्षांतील पहिले शवविच्छेदन?
बाळाचा मृत्यू झाल्याचे जाहीर केल्यानंतर या आठ महिन्यांच्या बाळाचे शवविच्छेदन करण्यात आले. गेल्या तीन वर्षांतील इतक्या लहान बाळाचे हे पहिलेच शवविच्छेदन असल्याचेही सांगण्यात येत होते. व्हिसेरा राखीव ठेवण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
पहिलाच बळी?
कुपोषणामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाळाचा मृत्यू झाल्याची नोंद नसल्याची माहिती महिला व बालकिकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. आर. तडवी यांनी दिली. त्यामुळे कुपोषित म्हणून रेफर केल्यानंतर मृत्यू झालेले हे पहिलेच बाळ आहे का? असाही एक प्रश्न समोर आला आहे. उंची व वजनानुसार ते योग्य प्रमाणात नसेल तर त्यावरून या बालकांची विभागणी केली जाते. यात सॅम व मॅम असे दोन प्रकारांमध्ये हे कुपोषित बालके मोडतात. त्यात तीव्र कुपोषित व मध्यम कुपोषित अशी विभागणी केली जाते.