लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात शनिवारी आढळलेल्या १४६ रुग्णांमध्ये ७८ रुग्ण हे एकट्या जळगाव शहरात आढळून आले आहे. शहरातील गणपती नगरातील एकाच कुटुंबातील ८ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. शनिवारी शहरात ॲन्टीजनच्या माध्यमातून २९ तर आरटीपीसीआरच्या माध्यमातून ४९ रुग्ण समोर आले आहेत. एका ६४ वर्षीय वृद्धाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सक्रिय रुग्णांची संख्या ८०० च्या घरात
जिल्ह्यात बाधित रुग्ण अधिक व बरे होणारे रुग्ण कमी असे चित्र असल्याने आता सक्रिय रुग्णांची संख्या चारच दिवसांमध्ये वाढून थेट ८७९ वर पोहचली आहे. रिकव्हरी रेट घटून ९६. १४ टक्क्यांवर पोहोचला आहे. होम आयसोलेशनमधील रुग्णांची संख्या वाढून ५९१ वर पोहोचली आहे.
१२३४ चाचण्या
शनिवारी ७२८ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली तर ५०६ जणांची ॲन्टीजन चाचणी झाली. दुसरीकडे आरटीपीसीआरचे ६०४ अहवाल प्राप्त झाले त्यात ७८ बाधित आढळून आले असून ॲन्टीजनमध्ये ६८ बाधित रुग्ण समोर आले आहेत. शहरातील बाधित रुग्णांचे प्रमाण हे सातत्याने आता वीस ते पंचवीस टक्क्यांवर पोहोचले.
शिवकॉलनी, मुक्ताईनगर हॉटस्पॉट
गणपती नगरात एकाच दिवसात ८ रुग्ण समोर आले आहेत. मात्र, शिवकॉलनी व मुक्ताईनगरातही सलग दोन दिवस रुग्ण आढळून येत आहे. यात शिवकॉलनी परिसरात दोन दिवसात ६ तर मुक्ताईनगरात दोन दिवसात ५ बाधित समोर आले आहेत. यासह महाबळ २, निवृत्तीनगर २, विवेकानंद नगर २, विद्युत कॉलनी, गुजराल पेट्रोलपंप, दादावाडी, समर्थनगर, सिंधी कॉलनी, राधाकृष्णनगर आदी भागात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.