जळगाव : महावितरणच्या जळगाव परिमंडळात गेल्या काही महिन्यांपासून १९ फिडरमधुन ७०ते ८० टक्के विजेची गळती होत असल्याचे महावितरणच्या निदर्शनास आले आहे. ही गळती रोखण्यासाठी फिडरनिहाय १९ सहायक अभियंत्यांची नियुक्ती केली आहे.
महावितरणतर्फे एकीकडे थकबाकीदारांविरोधात जोरदार कारवाई मोहिम राबविण्यात येत असतांना, दुसरीकडे विजेची चोरी करणाऱ्यांविरोधातही विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. यात `अति हानी वाहिनी सुधार योजने अंतर्गंत` पहिल्या टप्प्यात १९ फिडरमधील विज गळती किमान पंधरा टक्क्यापर्यंत आणण्याचे आवाहन ठेवण्यात आले आहे. या विज गळतीत होणाऱ्या फिडरमध्ये जळगाव जिल्ह्यात ११ फिडर असून, धुळे जिल्ह्यात ७ तर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील एक फिडर आहे. वेगवेगळ्या ठिकाणच्या या दिवसाला फिडरमधुन ७० ते ८० टक्के विजगळती होत असल्यामुळे, महावितरणचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. विशेष म्हणजे या वीज गळतीमुळे ट्रान्सफार्मर जळणे, अचानक विज पुरवठा खंडित होणे, तसेच कमी-आधिक प्रमाणात विजेचा प्रवाह आदी समस्या उद्भवत आहे. परिणामी यामुळे नियमित विजबिल भरणाऱ्या ग्राहकांनाच त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महावितरण प्रशासनाने या गळतीला आळा घालण्यासाठी धडक कारवाई मोहिम हाती घेतली आहे.
इन्फो :
सर्वाधिक विजगळती जळगाव शहरात
जिल्ह्यातील विज गळती होणाऱ्या ११ फिडरपैकी ८ फिडर हे एकट्या जळगाव शहरातील आहेत. यामध्ये सुप्रिम कॉलनी, मेहरुण, कवयित्री बहिणाबाई उद्यान परिसर, बळीराम पेठ, लाकुडपेठ, शिवाजीनगर आणि विठ्ठल पेठेचा समावेश आहे. येथील विजेची गळती रोखण्यासाठी गौरव वाघुळदे, चेतन सोनार, रोहित गोवे, हर्षल इंगळे, उमाकांत पाटील, अमोल चौधरी या सहायक अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
इन्फो :
गळती रोखण्यासाठी जोरदार कारवाई मोहिम
ज्या १९ फिडरमधुन मोठ्या प्रमाणावर विजगळतीचे प्रमाण आहे, त्या फिडर परिसरातील आकोड्यांद्वारे विजेची चोरी करणाऱ्या नागरिकांचे आकोडे जप्त करुन, त्या ठिकाणी एरियल बंच टाकणे, तसेच फिडर परिसरातील प्रत्येक ग्राहकांचे मीटर तपासणे, यामध्ये फेरफार आढळल्यास संबंधित ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करुन, घराबाहेरील विद्युत खांब्यावर मीटर बसविणे, आदी उपाययोजना करण्यात येत आहेत. दरम्यान, या कारवाईत आतापर्यंत खान्देशातील ८३१ आकोडे धारकांवर कारवाई करण्यात आली आहे. मीटरमध्ये फेरफार करणाऱ्या ३७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
इन्फो :
महावितरणच्या जळगाव परिमंडळात एकूण १९ ठिकाणच्या फिडरमधुन विविध मार्गाने मोठ्या ७० ते ८० टक्के विजगळती होत असल्याचे समोर आले आहे. ही गळती रोखण्यासाठी महावितरणतर्फे विविध उपाययोजना करण्यात येत असून, यासाठी फिडरनिहाय सहायक अभियंत्यांची नियुक्ती केली आहे. महावितरणतर्फे लवकरच या गळतीला आळा घालण्यात येईल.
दीपक कुमठेकर, मुख्य अभियंता महावितरण, जळगाव परिमंडळ.