लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात होत असलेला लाॅकडाऊन, मिनी लाॅकडाऊन तसेच वेगवेगळे निर्बंध याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांच्या दिमतीला ८०० होमगार्ड देण्यात आले आहेत. दरम्यान, मागील वर्षी कोरोनाच्या काळात बंदोबस्त केलेल्या होमगार्डचे दोन महिन्यांचे वेतन थकीत आहे. या वेतनाची रक्कम चार कोटी रुपयांच्या घरात आहे.
जिल्हा पोलीस दलाच्या दिमतीला २२०० होमगार्ड नियुक्त करण्यात आले आहेत. या होमगार्डना कामाच्या स्वरूपात मोबदला दिला जातो. जेव्हा जेव्हा निवडणूक, सण, उत्सव किंवा कायदा सुव्यवस्था निर्माण होते, तेव्हा अशावेळी त्यांना पोलीस ठाण्याला नियुक्ती दिली जाते. तेथून त्यांना पाॅईंटवर पाठविले जाते. होमगार्डला दर महिन्याला वेतन नाही, मात्र ६७० रुपये प्रती दिवस याप्रमाणे त्यांना वेतन दिले जाते. सध्या जिल्हा पोलीस दलात ३३०० कर्मचारी नियुक्तीला आहेत. त्यांच्या बरोबरीला या होमगार्डला नियुक्त केले जात आहे. त्यांची नियुक्ती ही फक्त बंदोबस्तपुरतीच असते. इतर कागदोपत्री कामांमध्ये त्यांना लावले जात नाही.
चार कोटी रुपये थकले
होमगार्ड यांच्या वेतनाचे सात कोटी रुपये थकले होते. ऑक्टोबर महिन्यापर्यंत त्यांना वेतन देण्यात आले होते. त्यानंतर 'लोकमत'ने हा विषय लावून धरल्यावर दोन महिन्यांचे वेतन मिळाले होते. आता पुन्हा दोन महिन्यांचे वेतन थकलेले आहे. सध्या २२०० पैकी फक्त ८०० होमगार्ड नियुक्तीला आहेत. त्यांचेही वेतन मागील आर्थिक देयके काढले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोट.....
जळगाव जिल्ह्याला २२०० होमगार्ड मंजूर आहेत. त्यापैकी सध्या ८०० होमगार्डना बंदोबस्तासाठी नियुक्ती देण्याची परवानगी मिळालेली आहे. त्यांचे थकीत वेतनही निघालेले आहे. चालू एक-दोन महिन्यांचे वेतन थकीत आहे ते देखील लवकरच मिळेल.
- चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक