‘गिरणा’ ८२ टक्क्यांवर, ‘बोरी’चे सात दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 11:49 AM2020-09-07T11:49:12+5:302020-09-07T11:49:54+5:30

धरण साठ्यांमध्ये वाढ

At 82 per cent, the mill opened seven doors | ‘गिरणा’ ८२ टक्क्यांवर, ‘बोरी’चे सात दरवाजे उघडले

‘गिरणा’ ८२ टक्क्यांवर, ‘बोरी’चे सात दरवाजे उघडले

Next

जळगाव : धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत असून यात गिरणा धरणाच्या साठ्यातही वाढ होऊन धरणसाठा ८१.८१ टक्क्यांवर पोहचला आहे. बोरी धरणातही ९८.६४ टक्के पाणीसाठी झाला असून धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले आहे. तसेच वाघूर धरणही शंभर टक्क्यांवर कायम असून हतनूर धरण ७३.०२ टक्क्यांवर पोहचले असून धरणाचे चार दरवाजे उघडे आहेत.
गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने धरण साठ्यात सातत्याने वाढ होत आहे. वाघूर नदीचा उगम असलेल्या अजिंठा लेणी परिसरातील डोंगररांगांमध्ये पाऊस होत असल्याने जळगावनजीकच्या वाघूर धरण साठ्यात वाढ होत आहे. यामुळेच धरण साठा शुुक्रवार, ४ सप्टेंबर रोजीच १०० टक्के भरले.
बोरी धरणाचे सात दरवाजे उघडे
पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील बोरी धरणातही पाण्याची आवक सुरू असल्याने या धरणाचे पाच दरवाजे शनिवारी रात्री १० वाजता पाच दरवाजे ०.१५ मीटरने उघडण्यात आले. त्यानंतर रात्री साडे अकरा वाजता एकूण सात दरवाजे ०.१५ मीटरने उघडण्यात आले. धरणातून तीन हजार १५८ क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असून धरणाची पाणी पातळी सध्या २६७.१५ मीटरवर आहे.
गिरणा धरणात आवक सुरू असल्याने धरण साठा ८१.८१ टक्क्यांवर पोहचला आहे. ६ जुलै रोजी धरणात ३७.८३ टक्के असलेला साठा १६ जुलैपर्यंत ३८.२६ टक्क्यांवर पोहचला होता. त्यानंतर २६ जुलै रोजी हा साठा ४२.४९ टक्क्यांवर पोहचला. त्यानंतर १४ आॅगस्ट रोजी हा साठा ४५.६३ टक्के झाला होता. २१ रोजी हा साठा ६०.३६ झाला व आता दोन दिवसात त्यात पुन्हा तीन टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होऊन हा साठा २३ आॅगस्ट रोजी ६३.६६ टक्के झाला. त्यानंतर २६ रोजी धरणसाठा ६९.३८ टक्के झाला. वाढ सुरूच राहून ३० आॅगस्ट रोजी हा साठा ७८.५८ टक्के झाला. त्यानंतर ४ आॅगस्ट रोजी धरणसाठा ८०.२५ टक्के झाला. ६ सप्टेंबर रोजी ८१.८१ टक्क्यांवर पोहचला आहे.
वाघूर धरणात सध्या आवक सुरू असली तरी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आल्याने सध्या साठा १०० टक्क्यांवर कायम आहे. ६ जुलै वाघूर धरणात ७२.३४ टक्के साठा होता. तो १६ जुलै रोजी ७८.१८ टक्क्यांवर पोहचला. त्यानंतर २६ जुलै रोजी हा साठा ८२.७५ टक्के झाला. यात वाढ सुरूच राहून तो १४ आॅगस्ट रोजी ८९ टक्क्यांवर पोहचला. त्यानंतर आता आठवडानंतर पुन्हा चार टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होऊन रविवार, २३ आॅगस्ट रोजी धरण साठा आता ९३.०१ टक्क्यांवर पोहचला होता. त्यानंतर २६ आॅगस्ट रोजी ९५.८१ टक्के साठा झाला होता. त्यानंतर ३० आॅगस्ट रोजी हा साठा ९९.३० टक्के झाला. त्यानंतर ४ सप्टेंबर रोजी धरण १०० टक्के भरले.
हतनूर धरणाचीही पाणी पातळी वाढत असल्याने धरणाचे दरवाजे दररोज उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या धरणाचे ४ दरवाजे दीड मीटरने उघडे असून धरणातून १५ हजार ८२३ क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात सध्या ७३.०२ टक्के साठा आहे.




 

Web Title: At 82 per cent, the mill opened seven doors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव