८७ वर्ष वय, ९ स्कोर तरीही आजींनी हरविले कोरोनाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:13 AM2021-05-30T04:13:55+5:302021-05-30T04:13:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : इच्छाशक्ती, वेळेवर निदान, वेळेवर योग्य उपचार असतील तर कोरोनाला हरविणे शक्य असल्याचा संदेश ८७ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : इच्छाशक्ती, वेळेवर निदान, वेळेवर योग्य उपचार असतील तर कोरोनाला हरविणे शक्य असल्याचा संदेश ८७ वर्षीय आजींनी दिला आहे. कोरोनाची लागण होऊन सीटीस्कॅन स्कोर ९ पर्यंत होता. मात्र, त्यांनी न घाबरता वेळेवर योग्य उपचार घेतल्याने आठवडाभरात त्यांनी कोरोनाला हरविले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले.
कोरोनाची सौम्य लक्षणे असतानाच तपासणी करून निदान केल्यास पुढील धोके टाळता येऊ शकतात, असे डॉक्टर वारंवार सांगतात. मात्र, अनेक जण स्थानिक पातळ्यांवर साधारण उपचार करण्यात वेळ घालवतात व गंभीरावस्थेत रुग्णालयात दाखल होतात. एकूण मृत्यूपैकी अधिकांश मृत्यू हे रुग्णालयात येण्यास उशीर हे कारणाने झाल्याचे निष्कर्ष डॉक्टरांनी काढले आहे. मात्र, कोरोनाचे वेळेवर उपचार झाल्यास कोरोनाचे धोके टाळता येतात, अशीही अनेक उदाहरणे आहेत. असेच एक उदाहरण म्हणजे अपना घर कॉलनीतील रहिवासी असलेल्या भागाबाई पंढरी पाटील. त्यांचे वय ८७ वर्ष असून त्यांना अशक्तपणाचा त्रास जाणवू लागला. त्यांच्या पांढऱ्या पेशी कमी झाल्याचे निदान झाले, मात्र, कुटुंबीयांनी वेळ न दडवता, तातडीने ॲन्टीजन चाचणी केली. मात्र, ती निगेटीव्ह आली. मात्र, लक्षणे असल्याने आरटीपीसीआर चाचणी करून घेतली. कोरोनाचे वेळेवर निदान झाल्यास, वेळेवर उपचार झाल्यास जर ऐवढी वयस्कर व्यक्ती कोरोनाला हरवू शकते, तर कोणीही कोरोनाला हरवू शकते, असा संदेश या आजींनी दिला आहे.
आठवडाभर उपचार
२० मे रोजी भागाबाई यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी सीटीस्कॅन केल्यानंतर त्यांचा स्कोर ९ आला. या ठिकाणी वेळेवर औषधोपचार, चहा नाष्टा, चांगले वातावरण, डॉक्टरांकडून वेळेवर तपासणी या बाबींमुळे आठवडाभरात त्यांनी कोरोनावर मात केल्याचे त्यांचे नातू ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितले.
एक्सरे सामान्य
तब्बेत बरी झाल्यानंतर घरी सोडण्या आधी जीएमसीत आजींचा एक्सरे काढण्यात आला. तो सामान्य आल्यानंतरच त्यांना घरी सोडण्यात आले. आता आजींची तब्येत चांगली असल्याचे ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितले.