भडगाव तालुक्यात ९ लाखांचा गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 08:15 PM2019-07-14T20:15:54+5:302019-07-14T20:16:37+5:30
देव्हारी शिवारात छापा : दोघे अटकेत
भडगाव (जि. जळगाव) : तालुक्यातील देव्हारी शिवारातील शेतामध्ये असलेल्या घरातून १४ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास पोलिसांनी सुमारे ४३७ किलो गांजा पकडला. या गांजाची किंमत ८ लाख ७४ हजार रुपये इतकी आहे. याप्रकरणी पोलिसांनी २ जणांना अटक केली आहे. यातील १ आरोपी पसार होण्यात यशस्वी झाला आहे.
एवढ्या मोठया प्रमाणात गांजा पकडल्याची ही जिल्ह्यातील पाहिलीच घटना असावी. हा गांजा खतांच्या पोत्यांमध्ये भरून ठेवलेला आढळून आला. यावेळी पोलिसांनी सुनील मोहिते, संजय सरदार दोन्ही रा. देव्हारी यांना अटक केली असून त्यांचा एक साथीदार घटनास्थळावरून पसार झाला आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
या गांजाबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यावरुन पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक लोहित मतांनी, चाळीसगाव विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी उत्तम कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली भडगाव पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे, चाळीसगाव पोलीस निरीक्षक विजय कुमार ठाकूरवाड , स.पो.नि. रवींद्र जाधव, पोलिस उपनिरीक्षक अनंतराव पटारे, पो.ना. लक्ष्मण पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान यातील आरोपी सुनील मोहिते यांच्यावर आधीही गांजा पकडल्याचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.