जळगाव/रावेर : रावेर तालुक्यातील पाल राखीव वनक्षेत्रात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या दीपला माल्या बारेला (वय ९, रा.मांजल, मध्य प्रदेश) या मुलावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी सकाळी साडे नऊ वाजता घडली. या हल्ल्यात दीपला यानेही बिबट्याशी झुंज दिली. त्यात त्याच्या तोंड, मान व डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. पाल येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर दुपारी त्याला जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नातेवाईक व वन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशाच्या हद्दीतील मांजल येथील रहिवाशी असलेला दीपल्या बारेला हा मुलगा बुधवारी गावापासून काही अंतरावरच पालच्या मोंढेच्या ६१ या वनक्षेत्रात मित्रासोबत शेळ्या चारण्यासाठी गेला होता. जंगलात शेळ्या चरत असताना अचानकपणे बिबट्याने एका शेळीवर हल्ला चढविला, त्यानंतर दीपला याच्यावर हल्ला चढविला. यात नाकावर, तोंडावर, पायावर व पाठीवर वार करीत त्याला गंभीर जखमी केले. या हल्ल्याच्यावेळी दीपल्यासोबत असलेले काही मुले घटना स्थळावरून पळून गेली.
या मुलांनी गावात जाऊन गावकऱ्यांना घटनेबाबत सांगितले. दीपलाचे वडील माल्या बारेला व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली, तोपर्यंत बालकाला गंभीर जखमी करून बिबट्या पसार झाला होता. दीपला याला दुचाकीवर तात्काळ पाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन पाटील यांनी प्राथमिक उपचार केले. दुपारी जळगाव येथे शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. सहाय्यक वनसंरक्षक अश्विनी खोपडे, वनपरिक्षेत्र अधिकारी सत्यजित निकम व वनरक्षक नवल चव्हाण यांनीही रुग्णालयात येऊन या दीपला व त्याच्या वडिलांची भेट घेतली.
वन्य जीवांच्या हल्ल्यात २५ बळीचालु वर्षात जिल्ह्यातील वन्यजीवांच्या हल्ल्यात ठार झालेल्यांची संख्या २५ वर पोहचली आहे. यात वाघाच्या हल्ल्यात १५, बिबट्याच्या हल्ल्यात ९ व अस्वल तसेच रानडुकराच्या हल्ल्यात एकाची बळी गेला आहे.