साक्षीदाराला मागितली चार कोटींची खंडणी; 5 जणांविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 10:18 AM2023-11-19T10:18:09+5:302023-11-19T10:18:38+5:30
दिग्गज नेत्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याच्या कथित प्रकरणात अडचणीत आलेले ॲड. प्रवीण चव्हाण यांच्याविरोधात यापूर्वीच गुन्हे दाखल आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव शहर व चाळीसगाव पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमधील साक्षीदार तेजस रवींद्र मोरे (३४, रा. जिल्हा परिषद कॉलनी, जळगाव) यांना धमकी देत चार कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी माजी विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांच्यासह त्यांचे पुत्र चिन्मय चव्हाण व अन्य तीन अशा पाच जणांविरुद्ध जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिग्गज नेत्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याच्या कथित प्रकरणात अडचणीत आलेले ॲड. प्रवीण चव्हाण यांच्याविरोधात यापूर्वीच गुन्हे दाखल आहेत. यामध्ये तेजस मोरे हे साक्षीदार असून, त्यांनी साक्ष देऊ नये, यासाठी त्यांचे वाहन अडवून तुला जिवंत सोडणार नाही म्हणजे साक्ष फिरविण्याचा प्रश्नच राहणार नाही, अशी तिघांनी धमकी दिली. तुला जिवंत राहायचे असेल तर ॲड. चव्हाण यांना न्यायालयाच्या खर्चासाठी चार कोटी द्यावे लागतील, अशीही धमकी दिली.
ॲड. चव्हाणचे कारनामे
ॲड. चव्हाण समोर न येता त्यांचा मुलगा चिन्मय चव्हाण यांच्या सांगण्यावरून विलास शांताराम आळंदे, निखिल विलास आळंदे, स्वप्निल विलास आळंदे यांना हाताशी धरून धमकी देऊन चार कोटी रुपयांची खंडणी मागण्याचा प्लॅन केला, असा मोरे यांचा दावा आहे.