महिलेची ट्रेनमध्येच प्रसूती, ‘काशी एक्स्प्रेस’मध्ये जन्माला आला म्हणून नाव ठेवले ‘काशिनाथ’

By सचिन देव | Published: March 13, 2023 08:41 PM2023-03-13T20:41:23+5:302023-03-13T20:41:46+5:30

गाडीच्या नावावरून बापाने मुलाचे केले ‘काशिनाथ’ नामकरण

A woman gave birth in a train, was born in the 'Kashi Express', hence the name 'Kashinath'. | महिलेची ट्रेनमध्येच प्रसूती, ‘काशी एक्स्प्रेस’मध्ये जन्माला आला म्हणून नाव ठेवले ‘काशिनाथ’

महिलेची ट्रेनमध्येच प्रसूती, ‘काशी एक्स्प्रेस’मध्ये जन्माला आला म्हणून नाव ठेवले ‘काशिनाथ’

googlenewsNext

जळगाव : मुंबईवरून काशी एक्स्प्रेसने प्रयागराजकडे जाणाऱ्या महिलेला असह्य वेदना होऊन, या महिलेने धावत्या गाडीतच चाळीसगाव रेल्वे स्टेशनजवळ एका बाळाला जन्म दिल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. काशी एक्स्प्रेसमध्ये मुलगा जन्माला आल्याच्या आनंदात बापाने मुलाचे गाडीतच ‘काशिनाथ’ म्हणून नामकरण केले आहे.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील रहिवासी मनोज गौतम हे पत्नी नीलमला प्रसूतीसाठी मुंबईहून काशी एक्स्प्रेसने (गाडी क्रमांक १५०१७) प्रयागराजला गावाकडे घेऊन जात होते. काशी एक्स्प्रेसमधून एस- १ या डब्यातून प्रवास करत असताना, नीलम यांना अचानक प्रसूती वेदना सुरू झाली. यावेळी गाडी नांदगाव स्टेशन सोडल्यानंतर चाळीसगाव स्टेशनकडे येत होती. पत्नीला प्रसूतीच्या वेदना होत असल्याचे पाहून मनोज यांनी तत्काळ गाडीतील टीटीईला याबाबत माहिती देऊन, गाडी थांबविण्याची विनंती केली. मात्र, रस्त्यात कुठेही गाडी थांबविल्यानंतर उपचाराची सुविधा होणार नसल्याने, थेट चाळीसगाव स्टेशनलाच गाडी थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी रेल्वेच्या कंट्रोल रूमतर्फे चाळीसगाव रेल्वे प्रशासनाला घटनेची माहिती देऊन, स्टेशनवरच डॉक्टरांची टीम सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले. यानंतर लागलीच चाळीसगाव रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग पाटील, सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर पांढरे, महिला पोलिस कर्मचारी मनीषा सोर, दिलीप कोळी यांनी काही मिनिटांत स्टेशनवर डॉक्टरांची टीम तैनात केली होती.

मातेने गाडीतच दिला बाळाला जन्म..

प्रसूतीच्या वेदना असह्य होत असल्याने गाडीतील इतर महिला प्रवाशांच्या मदतीने या मातेने गाडीतच गोंडस बाळाला जन्म दिला. चाळीसगावला गाडी आल्यानंतर डॉ. लाठी यांनी आई-बाळावर प्राथमिक उपचार करून त्यांना लागलीच चाळीसगावातील सरकारी रुग्णालयात दाखल केले.

अन् गाडीतच झाले मुलाचे नामकरण..

पत्नीला गावी प्रसूतीसाठी नेताना गाडीतच पत्नीची सुखरूप प्रसूती होऊन तिने मुलाला जन्म दिला. मुलगा जन्माला आल्याचे पाहून बापाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. यावेळी बापाने काशी एक्स्प्रेसमध्ये पत्नी प्रसूत झाल्यामुळे या गाडीच्या नावावरून बाळाचे नाव ‘काशिनाथ’ ठेवत असल्याचे सर्वांना सांगितले.

Web Title: A woman gave birth in a train, was born in the 'Kashi Express', hence the name 'Kashinath'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.