लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : धरणगाव येथून दोन ट्रकमधून ५० टन तांदूळ गोंदिया येथे जात असताना एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने धाड टाकून पकडला. ही कारवाई अजिंठा चौफुली येथे शुक्रवारी रात्री ११.३० वाजता करण्यात आली. दरम्यान, हा तांदूळ रेशनचा असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी दोन्ही ट्रक व तांदूळ जप्त केले असून याबाबत पोलिसात नोंद घेण्यात आली आहे. पोलिसांचे एक पथक धरणगाव येथे तपासासाठी रवाना झाले आहे. तसेच तांदळाचे नमुने तपासणीसाठी तहसीलदारांकडे दिले आहे.
धरणगावातून रेशनचा तांदूळ दोन ट्रकांमध्ये भरून तो गोंदियातील काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना शुक्रवारी रात्री मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांचे पथक रात्री ११.३० वा. अजिंठा चौफुलीकडे रवाना झाले. नंतर चौकात नाकाबंदी करून वाहनांच्या तपासणीला सुरुवात करण्यात आली. काही वेळानंतर एमएच.२०.डीई.९६६४ व एमएच.१८.एए.८५७४ अशा क्रमांकाचे दोन ट्रक अजिंठा चौफुलीच्या दिशेने येताना पोलिसांना दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही ट्रक थांबवून ट्रक चालक इब्राहीम शेख ईस्माईल (३२) व मुश्ताक अली अय्युब अली (४० दोन्ही रा. चोपडा) यांना वाहनात काय साहित्य आहे, याची विचारणा केली़.
चालकांनी दिली उडवा-उडवीची उत्तरे
पोलिसांनी दोन्ही चालकांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी तांदूळ धरणगाव येथून भरलेला असून तो गोंदिया येथे वाहून नेत असल्याची माहिती चालकांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी ट्रकची झडती घेतली. त्यात तब्बल ५० टन तांदूळ पोलिसांना आढळून आला. विशेष म्हणजे, तांदूळ भरण्यासाठी वेगळी पोती वापरल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यानंतर चालकांना मालाच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली असता, दोन्ही चालकांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे ट्रकमधील तांदूळ हा रेशनचा असून तो काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याचा संशय पोलिसांना आला. नंतर दोन्ही ट्रक पोलिसांनी ताब्यात घेऊन जप्त केले. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती़
तहसीलदारांना पाठविले पत्र
ट्रक आणि तांदूळ जप्त केल्यानंतर शनिवारी सकाळी एमआयडीसी पोलिसांनी ट्रकमधील माल हा पोषण आहारातील आहे किंवा कुठला आहे, याची तपासणी व्हावी, यासाठी तहसीलदार यांना पत्र पाठविले. तसेच तहसीलदारांच्या पथकाकडून तांदुळाचे नमुने घेण्यात आले आहे. दुसरीकडे याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून शनिवारीसुध्दा चालकांनी कसून चौकशी केली जात होती.
कोट
पोलिसांनी जप्त केलेला तांदूळ हा रेशनचा असल्याचा संशय आहे. त्या दृष्टीने तपासासाठी धरणगाव येथे एक पथक रवाना केले आहे. हा तांदूळ गोंदियाकडे जात होता. तांदळाचे नमुने तहसीलदारांकडे तपासणीसाठी पाठविले आहे. या प्रकरणात अजून गुन्हा दाखल नाही.
- प्रताप शिकारे, पोलीस निरीक्षक, एमआयडीसी पोलीस स्टेशन, जळगाव.