जळगाव : नवीन विजेच्या जोडणीसाठी रितसर अर्ज केल्यानंतर महावितरणतर्फे काही दिवसांनी मीटर बसविण्यात आले. मात्र, विद्युत खांब्यावरून विजेची जोडणी न करता संबंधित ग्राहकाला महावितरणतर्फे तब्बल दोन वर्षांपासून वीजबिलाची आकारणी करण्यात येत असल्याचा प्रकार अजय कॉलनीत उघडकीस आला आहे.
रिंगरोड वरील अजय कॉलनीतील रहिवासी इंदरचंद गोलेच्छा यांनी ‘थ्री फेज’ची वीज जोडणी मिळण्यासाठी महावितरणच्या गणेश कॉलनीतील कार्यालयाकडे अर्ज केला होता. अर्ज केल्यानंतर गोलेच्छा यांना महावितरणकडून २७ जुलै २०१८ रोजी ७ हजार ६८४ रुपये डिमांड नोट भरायला सांगितले. त्यानुसार गोलेच्छा यांनी २ ऑगस्ट २०१८ ला ही रक्कम भरली. त्यानंतर काही महिन्यांनी महावितरणतर्फे गोलेच्छा यांच्या घरी फक्त मीटर लावण्यात आले. विजेची जोडणी करण्यात आली नाही. विजेची जोडणी करण्याबाबत गोलेच्छा यांनी अनेकवेळा गणेश कॉलनीतील कार्यालयाकडे पाठपुरावा केला. मात्र, तेथील सहायक अभियंता मिलिंद इंगळे यांच्याकडून दहा हजार रुपयांची मागणी करण्यात येत असल्यामुळे गोलेच्छा यांनी ही रक्कम भरली नाही. मात्र, दर महिन्याला येणाऱ्या बिलाबाबत गोलेच्छा यांनी १७ जुलै २०१९ पासून अनेकवेळा वीज जोडणी नसताना, येणाऱ्या बिलाबाबत अर्ज करून, महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीदेखील घेतल्या होत्या. मात्र, तरीदेखील गोलेच्छा यांच्याकडे विजेची जोडणी झाली नसून, १० फेब्रुवारीला त्यांना ८ हजार ४८० रुपयांचे वीज बिल देण्यात आले आहे.
इन्फो :
विजेची जोडणी करण्यासाठी महावितरणचे अभियंता मिलिंद इंगळे यांनी दहा हजारांची मागणी केली, तरच वीज जोडणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. मी ही रक्कम न भरल्यामुळे त्यांच्याकडून दर महिन्याला विजेची जोडणी नसतानांही नाहक वीज बिल देण्यात येत आहे. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करूनही दखल घेण्यात आलेली नाही.
जितेंद्र गोलेचा, तक्रारदार
इन्फो :
महावितरणचे ग्राहक गोलेच्छा यांना वीज आकारणीचे बिल देण्यात येत नसून, स्थिर आकाराचे दर महिन्याला बिल देण्यात येत आहे. त्यांचे बारचे काम अपूर्ण असल्यामुळे विजेची जोडणी करण्यात आली नाही. तसेच आम्ही त्यांच्याकडे कुठलीही पैशांची मागणी केलेली नाही. आम्ही त्यांच्याकडे विजेच्या जोडणीसाठी गेलो असता, तेच आम्हाला धमकावतात.
मिलिंद इंगळे, सहायक अभियंता, महावितरण