जळगाव : दुचाकीने घराकडे जात असताना मागून आलेल्या कंटेनरच्या चाकाखाली आल्याने अरुण महादू बागुल (वय ६०,रा.खोटे नगर) यांचे दोन्ही पाय निकामी झाले. या घटनेत रक्ताच्या थारोळ्यात व प्रचंड विव्हळत असतानाही एकाही रिक्षा चालकाने किंवा अन्य वाहनाने त्यांना मदत केली नाही. २५ मिनिटानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले.बुधवारी सायंकाळी साडे सहा वाजता महामार्गावर गुजराल पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला. दरम्यान, खराब रस्त्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, अरुण बागुल हे बुधवारी सायंकाळी दुचाकीने (क्र.एम.एच. १९ के. ६२२७) महामार्गावरुन खोटेनगरकडे जात होते. त्यांच्यामागे पार्सलचा कंटेनर (क्र. जी. जे. २७ व्ही.००५४) येत होता. हा कंटेनर ओव्हरटेक करत असताना पुढे बागुल यांचा तोल जाऊन ते खाली पडल्याने त्यांचे दोन्ही पाय कंटेनरच्या चाकाखाली आले. या अपघातात गंभीर जखमी झाले. दोन्ही पायांचे तुकडे पडल्याचे सांगितले जात होते. भयानक दृष्य असताना बंदोबस्तावर असलेले पोलीस रिक्षा चालकांना दवाखान्यात नेण्यासाठी विनंती करीत होते, मात्र एकाही रिक्षा चालकाने माणुसकी दाखविली नाही. त्याचवेळी मागून आलेले सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र तथा जि.प.सदस्य प्रताप पाटील यांनी बागुल यांनी जिल्हा रुग्णालयात पोहचविण्याची व्यवस्था केली. दरम्यान, प्राथमिक उपचार करुन बागुल यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडीया अपघातामुळे महामार्गावर दोन्ही बाजुंनी वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यात बुधवारचा आठवडे बाजार असल्याने गर्दीची भर पडली. खोटेनगर ते शिवकॉलनीपर्यत वाहनांच्या रांगा लागल्या. रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. दरम्यान रस्त्यांची दयनीय अवस्था या अपघाताला कारणीभूत ठरली, असे लोकांनी सांगितले. बागुल यांची प्रकृती चिंताजनक आहे.
अपघातात दोन्ही पाय गमावलेला वृध्द घटनास्थळीच २५ मिनिटे विव्हळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 12:19 PM