एलसीबीच्या ताब्यातून पळालेल्या आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:21 PM2019-01-18T12:21:11+5:302019-01-18T12:22:48+5:30
पिस्तूल सापडले
जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या ताब्यातून धानोरा, ता.चोपडा येथून पलायन केलेल्या लिलाधर कैलास साळुंखे (वय २९, रा. धानोरा, ता.चोपडा) याला त्याच पथकाने गुरुवारी धानोरा येथून अटक केली. त्याच्याजवळ २० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तुलही आढळून आले. त्याच्याविरुध्द अडावद पोलीस स्टेशनला आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन दिवसापूर्वी लिलाधर साळुंखे याला ताब्यात घेतले होते. घरातून पिस्तूल काढून देण्याचा बहाणा करुन तो दुसऱ्या दरवाजाने पळून गेला होता. त्यामुळे पोलिसांवर मोठी नामुष्की ओढवली होती. साळुंखे याला ताब्यात घेतले असले तरी त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल नव्हता, किंवा त्याला अटकही केलेली नव्हती असा दावा पोलीस निरीक्षक बी.जी.रोहोम यांनी केला होता.
गावात लावला सापळा
साळुंखे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेल्यानंतर रोहोम यांनी सहायक पोलीस निरीक्षक महेश जानकर, हेडकॉन्स्टेबल नारायण पाटील, योगेश पाटील, महेंद्र पाटील, बापु पाटील, किशोर राठोड, मनोज दुसाने, विनोद पाटील, सुशील पाटील, विलास पाटील, दादाभाऊ पाटील, महेश पाटील, दीपक पाटील, किरण चौधरी, विनोद पाटील, प्रवीण हिवराळे व गफूर तडवी यांचे पथक तयार केले होते. या पथकाने गुप्त माहिती काढून गुरुवारी साळुंखे याला धानोरा येथूनच ताब्यात घेतले.